‘अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदे’ची (एआयसीटीई) मान्यता नसलेल्या राज्यातील १४ खासगी अभियांत्रिकी पदवी व पदविका महाविद्यालयांना प्रवेश प्रक्रिया राबवण्यास उच्च न्यायालयाने परवानगी दिली असली तरी या संस्थांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे भवितव्य अधांतरीच राहण्याची शक्यता आहे.
पात्रता निकषांची पूर्तता न केल्याने ‘एआयसीटीई’ने राज्यातील १९ खासगी अभियांत्रिकी पदवी व पदविका संस्थांना २०१४-१५ या शैक्षणिक वर्षांचे प्रवेश करण्यास मनाई केली आहे. त्यामुळे, राज्यातील अभियांत्रिकी अभ्यासक्रमांकरिता ‘केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया’ (कॅप) राबविणाऱ्या तंत्रशिक्षण संचालनालयाने या संस्थांना प्रवेश प्रक्रियेत सहभागी करून घेण्यास नकार दिला होता. त्यास या १४ महाविद्यालयांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले असता या महाविद्यालयांना ‘कॅप’मध्ये सहभागी करून घेण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला. २०१४-१५ या शैक्षणिक वर्षांसाठी प्रवेश प्रक्रिया राबवण्यास परवानगी देणारा न्यायालयाचा हा निर्णय तात्पुरता (अंतरिम) स्वरूपाचा आहे. थोडक्यात या महाविद्यालयांमध्ये २०१४-१५ या वर्षी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे भवितव्य न्यायालयाच्या अंतिम निकालावर अवलंबून असणार आहे.
आपल्या अंतरिम आदेशात संस्थाचालकांनी विद्यार्थ्यांचे प्रवेश आपल्या जबाबदारीवर करावे, असे न्यायालयाने स्पष्ट म्हटले आहे.म्हणजेच भविष्यात न्यायालयाचा निकाल महाविद्यालयांच्या विरोधात गेल्यास या विद्यार्थ्यांना कोणीही वाली नसेल. या महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची जबाबदारी घेण्यास संचालनालयाने तर न्यायालयातच स्पष्ट नकार दिला होता. त्याबाबत स्पष्ट सूचनाच काढण्याची तयारी संचालनालयाने केली आहे.
या १४ महाविद्यालयांमध्ये मिळून तब्बल सात ते साडेसात हजार जागा आहेत. न्यायालयाने मान्यता दिल्याने या जागांचे पर्याय संचालनालय आपल्या प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देईल. मात्र, विद्यार्थ्यांनाही या ठिकाणी स्वत:च्या जबाबदारीवर प्रवेश घ्यावा लागेल, हे स्पष्ट आहे.

‘एआयसीटीई’ ने मान्यता नाकारलेली महाविद्यालये
१) दत्ता मेघे कॉलेज ऑफ इंजि. एरोली, नवी मुंबई<br />२) नगरयोग शिक्षण संस्थेचे श्रीराम पॉलिटेक्निक, नवी मुंबई
३) इंदिरा गांधी कॉलेज ऑफ इंजि., कोपरखैरणे
४) सरस्वती एज्यु. सोसायटी कॉलेज ऑफ इंजि.,
खारघर, नवी मुंबई
५) सरस्वती एज्यु. सोसायटीचे रेव्हेरा इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, खारघर
६) महात्मा एज्यु. सोसायटीचे पिल्लई इंजि. कॉलेज, पनवेल<br />७) एसआयईएस कॉलेज ऑफ इंजि., नेरूळ
८) तेरणा पॉलिटेक्निक, नेरूळ, नवी मुंबई
९) जव्हार एज्यु. सोसायटीचे अण्णासाहेब चुडामण
पाटील कॉलेज ऑफ इंजि., खारघर
१०) लोकमान्य टिळक कॉलेज ऑफ इंजि., कोपरखैरणे
एमजीएम कॉलेज ऑफ इंजि, कामोठे
११) वाटुमल इंजिनिअरिंग कॉलेज, वरळी
१२) पद्मभूषण वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ इंजि., चुनाभट्टी
१३) मनोहर फाळके मेमोरिअल पॉलिटेक्निक, चुनाभट्टी
१४) के. सी. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, ठाणे<br />कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, सातारा
(यापैकी वाटुमल आणि तेरणा पॉलिटेक्निकने न्यायालयात याचिका केलेली नाही)