01 December 2020

News Flash

वसतिगृहांमधील विद्यार्थी असुरक्षिततेच्या छायेत

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी कोटय़वधी रुपये खर्चून विकत घेतलेली अग्निशमन यंत्रणा गोदामात धूळ खात पडून असल्याने मुंबईतील मागासवर्गीय

| September 7, 2013 02:30 am

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी कोटय़वधी रुपये खर्चून विकत घेतलेली अग्निशमन यंत्रणा गोदामात धूळ खात पडून असल्याने मुंबईतील मागासवर्गीय वसतिगृहांमध्ये राहणारे हजारो विद्यार्थी असुरक्षिततेच्या छायेत वावरत आहेत.
काही अपवाद वगळता मुंबईसह राज्यभरात सर्वत्र समाजकल्याण विभागातर्फे मागासवर्गीय विद्यार्थ्यांकरिता बांधण्यात आलेल्या वसतिगृहांची दूरवस्था झाली आहे. स्वच्छता, नीटनेटकेपणा तर सोडूनच द्या; पण या वसतिगृहांमध्ये सुरक्षेची वानवा आहे. बहुतेक वसतिगृहांच्या इमारतींमधील दरवाजे, भिंती, जिने मोडकळीला आले आहेत. वसतिगृहांमध्ये कुठेही लोंबकळणाऱ्या विजेच्या तारा, सुरक्षेचा अभाव असलेले स्वयंपाकगृह यामुळे या ठिकाणी कधीही आगीसारखा दुदैवी प्रसंग ओढवू शकतो. वसतिगृहांमधील कुठल्याच इमारतीत अग्निशमन यंत्रणा बसविण्यात आलेली नाही. विद्यार्थ्यांच्या जीवाशी चालविलेल्या या खेळाविरोधात विविध विद्यार्थी संघटनांनी आवाज उठवल्यावर २६ जुलै, २०११ला सरकारने अर्थसंकल्पात राज्यभरातील २७१ विद्यार्थी वसतिगृहांमध्ये अग्निशमन यंत्रणा बसविण्यासाठी आर्थिक तरतूद केली. त्यानुसार, प्रत्येकी १,५२५ रुपये याप्रमाणे ९,६९० अग्निशमन यंत्रांची खरेदी करण्यात आली. त्यासाठी १ कोटी ४७ लाख ७७ हजार २५० रुपये खर्च करण्यात आले. त्यापैकी मुंबई शहरातील वसतिगृहांसाठी खरेदी करण्यात आलेल्या ५१ यंत्रांवर ७७,७७५ रुपये खर्च करण्यात आले. उपनगरासाठी ६० यंत्रांकरिता १,०३,७०० रुपये खर्चण्यात आले. पण, दोन वर्षांपासून मुंबईतील बहुतांश वसतिगृहांमधील अग्निशमन यंत्रणा गोदामात धूळ खात पडून असल्याचे विदारक वास्तव ‘प्रहार विद्यार्थी संघटने’ने केलेल्या पाहणीत पुढे आले आहे.
संघटनेने सामाजिक न्याय विभागाच्या प्रधान सचिवाकडे याबाबत लेखी तक्रार आणि गोदामात पडून असलेल्या अग्निशमन यंत्रणेची छायाचित्रे सादर केली. यंत्र खरेदीसाठी सरकारी आदेश काढले जातात. खरेदीही होते. त्यासाठी पैसे खर्चले जातात. पण, प्रत्यक्षात विद्यार्थी असुरक्षिततेच्या छायेतच वावरत आहेत, अशी तक्रार संघटनेचे मनोज टेकाडे यांनी केली. अग्निशमन यंत्रे कार्यान्वित करण्यास चालढकल करणाऱ्या वसतिगृहांच्या गृहपाल प्रमुखांवर कारवाई करण्याची मागणी अजय तापकीर यांनी केली. ही यंत्रणा लवकरात लवकर लावण्यात आली नाही तर आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 7, 2013 2:30 am

Web Title: students insecure in hostels fire security system in dust
Next Stories
1 डीएडच्या एक चतुर्थाश जागा रिक्त
2 महाविद्यालयांनी पाटर्य़ाना प्रतिबंध करावा – राज्य सरकारची सूचना
3 दहावीच्या इंग्रजी परीक्षेला आता ‘अ‍ॅक्टिव्हिटी शिट’
Just Now!
X