यावर्षीपासून पुनर्मूल्यांकनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पुनर्मूल्यांकनामध्ये सर्व उत्तरपत्रिका पुन्हा तपासण्यात येते. विद्यार्थ्यांनी प्रथम छायाप्रतीसाठी अर्ज करायचा आहे. छायाप्रतीसाठी प्रत्येक विषयासाठी ४०० रुपये शुल्क आहे. छायाप्रत देताना गुणपडताळणी म्हणजेच सर्व गुणांची बेरीज बरोबर आहे, याची खातरजमा करून छायाप्रत देण्यात येईल. उत्तरपत्रिकेची छायाप्रत मिळाल्यावर त्यावर शिक्षकांचे मत घेऊन गुण वाढतील असे वाटल्यास पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करायचा आहे. छायाप्रत मिळाल्यापासून पाच दिवसांमध्ये पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करणे आवश्यक आहे. जास्तीत जास्त तीन विषयांच्या पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करता येईल. पुनर्मूल्यांकनासाठी प्रत्येक विषयासाठी ३०० रुपये शुल्क आहे. ज्या विद्यार्थ्यांना फक्त गुणपडताळणी करायची आहे, त्यांनी छायाप्रतीसाठी अर्ज करण्याची आवश्यकता नाही. फक्त गुणपडताळणीसाठी ५० रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. गुणपडताळणी किंवा छायाप्रतीसाठी ऑनलाईन गुणपत्रकाच्या प्रिंटआऊटच्या आधारे विद्यार्थी अर्ज करू शकतात, अर्ज करण्यासाठी १९ जून अंतिम मुदत आहे.

ऑक्टोबर अर्ज
ऑक्टोबरच्या परीक्षेसाठी आणि श्रेणीसुधार योजनेचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतला आहे. ऑक्टोबर परीक्षेचे अर्ज भरण्याच्या तारखा आणि तपशील लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे मंडळाचे अध्यक्ष सर्जेराव जाधव यांनी सांगितले.

वेळापत्रक
गेली दोन वर्षे वर्षांच्या सुरूवातीलाच परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्याची पद्धत मंडळाने सुरू केली आहे. पुढील वर्षीच्या परीक्षांचे (२०१३-१४) वेळापत्रक १ जुलैला जाहीर करण्यात येणार आहे. प्रमुख विषयांच्या परीक्षेमध्ये पुरेसे अंतर ठेवून आणि गेल्या वर्षी आलेल्या सूचनांचा विचार करून वेळापत्रकाची आखणी करण्यात येईल. त्यानंतर विद्यार्थी अथवा शिक्षकांनी सूचना दिल्यास त्याचा विचार करून वेळापत्रकामध्ये बदल करण्यात येतील, असे मंडळाकडून सांगण्यात आले आहे.