20 October 2020

News Flash

श्रेयांक पद्धती सदोषच!

श्रेयांक-श्रेणी पद्धती राबविण्याचीच नव्हे तर तिच्या आधारे गुणदान करण्याची मुंबई विद्यापीठाची पद्धतीही सदोष असल्याचे स्पष्ट झाले असून विद्यार्थी आता या विरोधात स्वाक्षरी मोहीम राबविण्याच्या तयारीत

| February 13, 2014 01:07 am

श्रेयांक-श्रेणी पद्धती राबविण्याचीच नव्हे तर तिच्या आधारे गुणदान करण्याची मुंबई विद्यापीठाची पद्धतीही सदोष असल्याचे स्पष्ट झाले असून विद्यार्थी आता या विरोधात स्वाक्षरी मोहीम राबविण्याच्या तयारीत आहेत. विद्यापीठाने श्रेयांक-श्रेणी पद्धतीत योग्य बदल करावे यासाठी विद्यार्थ्यांतर्फे ही मोहीम राबवून निवेदन राज्यपाल के. शंकरनारायणन यांना सादर करण्यात येणार आहे.
श्रेयांक-श्रेणी पद्धती (क्रेडिट-ग्रेडिंग) राबविणारे पहिले विद्यापीठ असा टेंभा मुंबई विद्यापीठ सर्वत्र मिरवित असले तरी सखोल विचार न करता व शिक्षकांना विश्वासात न घेता विद्यार्थी व प्राध्यापकांच्या माथी मारण्यात आलेल्या या नव्या मूल्यांकन पद्धतीचा बोजवारा उडाल्याचे चित्र आहे. आता विद्यापीठाची श्रेयांक-श्रेणी पद्धतीनुसार गुणदान करण्याची पद्धतीही सदोष असल्याचे विद्यार्थ्यांना आपले निकाल हाती लागल्यानंतर कळून चुकले आहे. विद्यार्थ्यांमधील या असंतोषाला बुधवारी वाट फुटली. श्रेयांक-श्रेणी पद्धतीविषयी विद्यार्थ्यांच्या असलेल्या तक्रारींची दखल घेण्यासाठी ‘जॉइंट अ‍ॅक्शन कमिटी फॉर इम्प्रूव्हमेंट ऑफ हायर एज्युकेशन’ने बोलाविलेल्या बैठकीत विद्यार्थ्यांनी या पद्धतीतील अनेक दोष अधोरेखित केले. या बैठकीनंतर विद्यार्थ्यांनी या पद्धतीविरोधात स्वाक्षरी मोहीम राबविण्याचा निर्णय घेऊन आपल्या मागण्यांचे निवेदन राज्यपालांना सादर करण्याचा निर्णय घेतला.
श्रेणी पद्धतीच्या नावाखाली पदवीच्या अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाने ज्या पद्धतीने गुणदान केले आहे, त्यामुळे विद्यार्थी-शिक्षक चांगलेच चक्रावून गेले आहेत. उदाहरणार्थ एमडी महाविद्यालयातील अर्थशास्त्राच्या एका विद्यार्थ्यांला ३९० गुणांसाठी ‘अ’ श्रेणी बहाल करण्यात आली आहे. तिथे याच महाविद्यालयातील ३९४ गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांला ‘ब’ श्रेणी देण्यात आली आहे. या शिवाय ‘फायनान्शिअल मॅनेजमेंट’ या विषयात विद्यार्थ्यांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण यंदा फारच कमी आहे. बहुतेक महाविद्यालयांमध्ये हे प्रमाण २० ते ५० टक्क्यांच्या आसपास आहे.
केवळ याच नव्हे तर तर कला, विज्ञान, वाणिज्य अशा सर्वच शाखांमध्ये उत्तीर्णतेचे प्रमाण, श्रेणी बहाल करण्याची पद्धती यात प्रचंड गोंधळ असल्याची विद्यार्थ्यांची तक्रार असल्याचे ‘जॉईंट अ‍ॅक्शन कमिटी फॉर इम्प्रूव्हमेंट ऑफ हायर एज्युकेशन’चे नीरज हातेकर यांनी सांगितले. अंतर्गत मूल्यांकनाच्या आडून निकाल फुगविण्याच्या प्रकारावर तोडगा म्हणून विद्यापीठाने सुरू केलेला गुणांच्या ‘स्केलिंग डाऊन’चा प्रकार तर रोगापेक्षा इलाज भयंकर असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे,‘एसआयईएस’सारख्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी तर या विरोधात आंदोलनाचा पावित्रा घेतला होता.

‘बुक्टू’ची आज निदर्शने
विद्यापीठाच्या श्रेयांक-श्रेणी पद्धतीत अनेक दोष असल्याने ती एकतर रद्द तरी करण्यात यावी किंवा त्यात सुधारणा तरी करण्यात यावी, अशी ‘बुक्टू’ या विद्यापीठातील प्राध्यापकांच्या प्रमुख संघटनेचीही मागणी आहे. याच मागणीवरून प्राध्यापक ‘बुक्टू’च्या नेतृत्वाखाली गुरुवारी मुंबई विद्यापीठात निदर्शने करणार आहेत. या शिवाय प्राध्यापकांच्या पदोन्नतीसंदर्भातही विद्यापीठाने चालविलेले चालढकलीचे धोरण आणि प्रभावहीन झालेली तक्रार निवारण समिती हे दोन्ही मुद्दे प्राध्यापकांच्या या आंदोलनाचे मुख्य मुद्दे असणार आहेत. दुपारी दोन वाजता विद्यापीठाच्या फोर्ट संकुलात ही निदर्शने करण्यात येणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 13, 2014 1:07 am

Web Title: students oppose mumbai university credit grading system
Next Stories
1 शिक्षणमंत्र्यांच्या आश्वासनानंतर कपिल पाटील यांचे उपोषण मागे
2 माध्यमिक शाळांना अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा
3 वेळुकर अप्रामाणिक!
Just Now!
X