मुंबई विद्यापीठाच्या दूर शिक्षण संस्थेने (आयडॉल)पुन्हा खुल्या केलेल्या प्रवेशाच्या दरम्यान अशा अनेक विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातून ना हरकत प्रमाणपत्र मिळवून आयडॉलमध्ये असलेल्या पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेण्यास सुरुवात केली आहे. विद्यार्थ्यांच्या या नव्या वाटेमुळे व्यवस्थापनचे अभ्यासक्रम पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
महाविद्यालयांमध्ये सुरू करण्यात आलेली श्रेयांक पद्धती तसेच दिवसेंदिवस बाजारात घटत जाणारी व्यवस्थापन पदवीधरांची मागणी यामुळे विद्यार्थ्यांंनी आपला निर्णय बदलून पारंपरिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेण्यास सुरुवात केल्याचे निर्दशनास आले आहे. व्यवस्थापन क्षेत्राचा अभ्यास करून गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळवायची अशी आशा अनेक विद्यार्थ्यांना होती. पण सध्याची बाजारातील आर्थिक स्थिती पाहता ही आशा पूर्ण होण्याची चिन्हे नाहीत. याचबरोबर अनेक विद्यार्थी पदवी अभ्यासक्रमाबरोबरच सीए, सीएस, आयसीडब्ल्यूए अशा व्यावसायिक अभ्यासक्रमांनाही प्रवेश घेतात. पण सध्या सर्व अभ्यासक्रमांसाठी सर्व महाविद्यालयांमध्ये सुरू करण्यात आलेल्या श्रेयांक पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या बंधनात राहावे लागते. प्रथम वर्ष पूर्ण होईपर्यंत सीएची आयपीसीसीची परीक्षा उत्तीर्ण झाली तर विद्यार्थ्यांना आर्टिकलशिप करावी लागते. श्रेयांक पद्धतीमध्ये महाविद्यालय सांभाळून ही आर्टिकलशिप करणे अनेकांना शक्य होत नाही. म्हणून विद्यार्थी पारंपरिक अभ्यासक्रमांकडे वळत असल्याचे दिसून येत आहे.  
व्यवस्थापन किंवा इतर कोणत्याही शाखेतून प्रथम वर्ष उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांला पारपंरिक अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षांला प्रवेश घेता येतो. यासाठी हा विद्यार्थी महाविद्यालय किंवा आयडॉल अशा दोन्ही पर्यायांचा स्वीकार करू शकतो, असा विद्यापीठाचा नियम आहे. याचआधारे प्रथम वर्षांचे शिक्षण व्यवस्थापन शाखेत केलेले बहुतांश विद्यार्थी आता पारंपरिक अभ्यासक्रमांकडे वळू लागले आहेत. व्यवस्थापन अभ्यासक्रम पूर्ण करून विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या संधीमध्ये कमालीची घट झाली आहे. विद्यार्थ्यांना आता पूर्वीसारखी पॅकेजेस मिळत नाहीत यामुळे विद्यार्थी पारंपरिक अभ्यासक्रमाकडे वळत असल्याचे मत विद्यापीठाच्या वाणिज्य शाखचे अधिष्ठाता डॉ. मधू नायर यांनी व्यक्त केले. व्यवस्थापनाचा अभ्यसक्रम केल्यावर विद्यार्थ्यांना संधी शोधताना अनेक मर्यादा येतात या मर्यादा पारंपरिक अभ्यासक्रमांमध्ये नसल्याचेही त्यांनी नमूद केले.