मुंबई विद्यापीठाने महाराष्ट्र विद्यापीठ कायद्याचा उल्लंघन केल्याचा आरोप करत विद्यापीठाने गेली चार वष्रे अभियांत्रिकी महाविद्यालयांना संलग्नता दिलेली नाही, असा आरोप करीत मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू आणि विद्यापीठ व महाविद्यालय विकास मंडळाचे संचालक डॉ. राजपाल हांडे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी गेल्या काही दिवसांपासून मुक्ता संघटनेने लावून धरली आहे. या मागणीसाठी आता त्यांनी आक्रमक पवित्रा स्वीकारत येत्या काळात ही कारवाई न केल्यास उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा संघटनेतर्फे शुक्रवारी देण्यात आला.
मुंबई विद्यापीठाने गेली चार र्वष अभियांत्रिकी महाविद्यालयांना संलग्नता दिलेली नाही. यामुळे महाराष्ट्र विद्यापीठ कायद्याच्या कलम ८६ आणि ८७ चे व विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमांचे उल्लंघन झाले आहे. हे आम्ही यापूर्वीच राज्यपाल, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव तसेच न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलेले आहे. त्याचप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाने संलग्नतेसाठी घालून दिलेली १५ मेची मुदत ओलांडून गेल्यानंतर जागे झालेले मुंबई विद्यापीठ आता घाई घाईने ही प्रक्रिया पूर्ण करण्याच्या मागे आहे. पण सध्या महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी परीक्षेत गुंतलेले आहेत, शिक्षकवर्गही पुरेसा उपलब्ध नाही अशा परिस्थितीत चौकशी समित्या पाठवीत आहेत. विद्यार्थी आणि शिक्षकांचे प्रश्न जाणून न घेता समित्या काय अहवाल देणार? आणि जर एखाद्या वर्षांची संलग्नता समितीने नाकारली तर त्या वर्षी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या पदवीसंदर्भात गंभीर प्रश्न उभे राहतील असे प्रश्न संघटनेतर्फे उपस्थित करण्यात आले आहेत.
या सर्व प्रकरणानंतरही महाराष्ट्र सरकार आणि राज्यपाल जर संबंधितांवर कारवाई करणार नसतील तर या विरोधात जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा मुक्ता संघटनेचे वैभव नरवडे यांनी दिला आहे.