कनिष्ठ महाविद्यालयाच्या आवारात किंवा महाविद्यालयातील वर्गामध्ये खासगी शिकवणी वर्ग सुरू करून शिक्षणाचा बाजार मांडणाऱ्या महाविद्यालयांची शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून चौकशी केली जाणार आहे. मुंबई विभागातील सर्व कनिष्ठ महाविद्यालये आणि उच्च माध्यमिक शाळांना याबाबत शिक्षण उपसंचालकांनी लेखी पत्र पाठविले आहे.
काही दिवसांपूर्वी ‘लोकसत्ता’ने ‘शिक्षणाची दुकाने’ ही लेखमालिका प्रसिद्ध केली होती. त्यात काही कनिष्ठ महाविद्यालयात सुरू असलेल्या खासगी शिकवणी वर्गाबाबत माहिती दिली होती. याविषयी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेनेही शिक्षण उपसंचालकांकडे याविषयी तक्रार केली होती.
खासगी शिकवणी वर्गाना महाविद्यालयातील वर्ग उपलब्ध करून देणे हे माध्यमिक शाळा संहितेमधील नियम क्रमांक ७६-१ या भंग करणारे आहे. कोणत्याही कनिष्ठ महाविद्यालयाच्या आवारात किंवा महाविद्यालयांच्या वर्गखोल्यांमध्ये खासगी शिकवणी वर्ग चालत असतील किंवा खासगी शिकवणी वर्गाच्या शिक्षकांमार्फत वर्गात शिकविले जात असेल तर त्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या विरोधात कारवाई केली जाईल, असा इशाराही शिक्षण उपसंचालकांनी या पत्रात दिला आहे.
दरम्यान, शिक्षण उपसंचालकांच्या कार्यालयाकडून एका समितीमार्फत १५ दिवसांत या प्रकरणाची चौकशी करून कारवाई केली जाईल, असे लेखी पत्र शिक्षण उपसंचालकांनी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षांना दिले आहे.