‘महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती’ या शिक्षक संघटनेच्या अधिवेशनासाठी शाळेला सात दिवसांची दांडी मारणाऱ्या शिक्षकांना चौकशीला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.
या अधिवेशनाच्या निमित्ताने राज्यभरातील बहुतांश शिक्षक महाबळेश्वरला रजा घेऊन जाणार असल्याने शाळा तब्बल आठवडाभर बंद राहणार आहेत. ‘लोकसत्ता’त या संदर्भात वृत्त प्रकाशित झाल्यानंतर शालेय शिक्षण विभागाने या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे. शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यांनी या प्रकरणी चौकशीचे संकेत दिले आहेत.
गेल्या वर्षी सिंधुदुर्गला झालेल्या संघटनेच्या अधिवेशनाच्या वेळेसही राज्यातील शाळा तब्बल आठवडाभर बंद होत्या. त्यावेळी प्रसिद्धीमाध्यमांतून टीकेची बरीच झोड उठविण्यात आली. त्यामुळे, आम्ही त्याचवेळेस संघटनेला सुट्टी काळात अधिवेशन घेण्याची सूचना केली होती. तरीही शाळा सुरू असताना अधिवेशन घेण्यात आले आहे. म्हणून शाळा बंद करून अधिवेशनला हजेरी लावणाऱ्या शिक्षकांची चौकशी करण्यात येईल, असे संकेत शालेय शिक्षण विभागाने दिले आहेत.
यंदा ९ आणि १० जानेवारीला महाबळेश्वरला परिषदेचे अधिवेशन होणार आहे. दरवर्षी या संघटनेच्या अधिवेशनासाठी शिक्षकांना रजा दिली जाते.