मतदार याद्यांच्या पुन:परीक्षणाच्या कामासाठी जुंपलेल्या शिक्षकांना मुक्त करण्याचे आदेश मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. यामुळे सध्या या कामात असलेल्या शेकडो शिक्षकांना दिलासा मिळणार आहे.
शिक्षण हक्क कायद्यानुसार शिक्षकांना शिक्षणेतर कामांतून मुक्त करण्याची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये शिक्षकांना केवळ निवडणुकीच्या दिवसाचे काम देण्यात यावे असे नमूद करण्यात आले आहे. मात्र प्रत्यक्षात तसे न होता शिक्षकांना याद्यांच्या पुन:परीक्षणापासून ते अनेक कामे दिली जात आहेत. शिक्षण हक्क कायद्याची तरतूद दाखवत ज्या शिक्षकांनी ही कामे करण्यास नकार दिला त्यांना कारवाईच्या नोटीसाही बजावण्यात आल्या आहेत. यामुळे शिक्षकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली होती.
या संदर्भात विविध शिक्षक संघटनांनी आवाज उठविले आहे. शिक्षक आमदार कपिल पाटील यांनीही या संदर्भात मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी शेखर चन्न्ो यांची भेट घेऊन याबाबत चर्चा केली होती. या सर्वाची दखल घेत त्यांनी शिक्षकांना या कामातून वगळण्यात यावे असे आदेश दिले आहेत. यामुळे या विभागातील शिक्षकांना दिलासा मिळाला आहे.