माटुंगा येथील वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्था (व्हीजेटीआय)मध्ये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यावर झालेल्या अन्यायाविरोधात व इतर गैरप्रकाराविरोधात महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या संस्थेतील विभागातर्फे बुधवारी आंदोलन करण्यात आले. संस्थेतील प्राध्यापकांवर होणारे अन्याय आणि सध्या सुरू असलेल्या भरती प्रक्रियेतील गैरप्रकाराबाबत ‘लोकसत्ता’ने वाचा फोडली होती.
संस्थेतील रिक्त पदांची भरती करताना काही क्षुल्लक कारणांनी अनेक अर्ज बाद ठरविण्यात होते. यात संस्थेत सध्या काम करणाऱ्या अध्यापकांचे अर्जही होते. तसेच भरतीसाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीमध्येही वरिष्ठांना डावलण्यात आले होते. यामुळे महाविद्यालयातील अद्यापक आणि कर्मचाऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण होते. याचा निषेध म्हणून हे आंदोलन करण्यात आले होते.