राज्यातील तंत्रशिक्षण संस्थांमध्ये दोन सत्रांत अभ्यासक्रम चालवण्यावर आता गदा येण्याचीच चिन्हे आहेत. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने बदललेल्या नियमवालीमध्ये या अभ्यासक्रमासाठीचे र्निबध कडक केले आहेत. त्यामुळे या संस्था अडचणीत येण्याची चिन्हे आहेत.
अभियांत्रिकी, व्यवस्थापन, औषधनिर्माण अशा तंत्रशिक्षण अभ्यासक्रम संस्थांमध्ये दोन सत्रांत अभ्यासक्रम चालवण्यात येत आहेत. मात्र पायाभूत सुविधांच्या निकषांतून पळवाट मिळावी म्हणून संस्था सकाळी आणि सायंकाळी असा दोन सत्रांत अभ्यासक्रम सुरू असल्याचे दाखवण्यात येत होते. पदवी आणि दुसऱ्या सत्रांत पदविका अभ्यासक्रम चालवण्यात येत होता.
प्रत्यक्षात मात्र हा अभ्यासक्रम एकाच सत्रांत चालवला जायचा. दोन्ही सत्रांसाठी असलेले शिक्षकही तेच असायचे. आता मात्र या अभ्यासक्रमांवर गदा येण्याची चिन्ह आहेत.
परिषदेने तयार केलेल्या नव्या नियमावलीत दुपारी १ ते ९ या वेळेतच दुसरे सत्र चालवण्यात यावे असे बंधन टाकण्यात आले आहे.
एखादे महाविद्यालय दुसरे सत्र चालवण्याची परवानगी घेऊन ते स्वतंत्रपणे चालवत नसेल, तर त्या महाविद्यालयांची मान्यता काढून टाकण्याची तरतूदही करण्यात आली आहे. त्यामुळे दोन सत्रांसाठी महाविद्यालयांना स्वतंत्र शिक्षक भरावे लागतील अथवा आहे त्या शिक्षकांना रात्री ९ पर्यंत काम करण्याची वेळ येईल. दोन सत्रांसाठी स्वतंत्र शिक्षकांची नेमणूक करणे अनेक संस्थांना परवडणारे नसते. त्यामुळे अनेक संस्थांना आता एकाच सत्रात अभ्यासक्रम चालवावे लागतील, असे एका अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राचार्यानी सांगितले.

तपशील मागवले
तंत्रशिक्षण विभागानेही दुसऱ्या सत्रांत चालवल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमांची झाडाझडती सुरू केली आहे. राज्यातील सर्व तंत्रशिक्षण महाविद्यालयांकडे दुसऱ्या सत्रात चालवण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमाचे तपशील मागितले आहेत. कोणते अभ्यासक्रम चालवण्यात येतात, त्यांच्या वेळा, त्यासाठी काम करत असलेल्या शिक्षकांचे तपशील अशी माहिती विभागाने मागवली आहे.