केवळ तीनच विषयांच्या उत्तरपत्रिकांचे पुर्नमूल्र्याकन किंवा पुर्नमूल्यांकनात पाच वा त्याहून अधिक गुणांची वाढ झाल्यावरच वाढीव गुण ग्राह्य़ धरण्याची तरतूद अन्यायकारक असल्याची ओरड विद्यार्थ्यांकडून होते आहे.
‘महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा’चा निकाल नुकताच जाहीर झाला. यंदा प्रथमच बारावीच्या विद्यार्थ्यांना मंडळाने पुर्नमूल्यांकनाची सोय उपलब्ध करून दिली आहे. त्यातून विज्ञान शाखेमध्ये अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याची सार्वत्रिक तक्रार असल्याने निकालाच्या पहिल्या दिवसापासून विद्यार्थी उत्तरपत्रिकेच्या फोटोकॉपीसाठी आणि पुनर्मूल्यांकनाचे अर्ज भरण्यासाठी मंडळाच्या विभागीय कार्यालयांमध्ये गर्दी करत आहेत. परंतु, पुनर्मूल्यांकनाबाबतचे नियम फारच जाचक असल्याची टीका विद्यार्थ्यांकडून होते आहे.नियमाप्रमाणे विद्यार्थ्यांना केवळ तीनच विषयांचे पुर्नमूल्यांकन करून घेता येणार आहे. कारण एखाद्या विद्यार्थ्यांस गणितात ७० गुण असतील आणि त्याला ९० गुणांची अपेक्षा असेल आणि इतर विषयात देखील कमी गुण असतील तर केवळ ३ विषयांच्या फेरतपासणीची अट त्याला बाधक ठरून चांगल्या महाविद्यालातील प्रवेशापासून वंचित राहू शकतो. त्यामुळे ही अट रद्द करून विद्यार्थ्यांना हव्या तितक्या विषयांचे पुनर्मूल्यांकन करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेचे उपनेते अरविंद सावंत यांनी केली आहे.