News Flash

‘एफटीआयआय’मध्ये यंदाही नवीन प्रवेश नाहीत?

‘फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट’च्या विद्यार्थ्यांनी गेले ७३ दिवस पुकारलेल्या संपाचा फटका नवीन प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना बसणार असल्याचे चित्र आहे.

| August 24, 2015 12:19 pm

‘फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट’च्या विद्यार्थ्यांनी गेले ७३ दिवस पुकारलेल्या संपाचा फटका नवीन प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना बसणार असल्याचे चित्र आहे. रविवारी ३,२५६ नवीन विद्यार्थ्यांनी प्रवेश परीक्षा दिली आहे खरी, पण यंदाचे वर्षही ‘झीरो इअर’ म्हणून प्रवेशाविनाच जाणार असल्याचा अंदाज संस्थेच्या प्रशासनातील उच्चपदस्थ सूत्रांनी वर्तवला आहे.संस्थेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांचे अभ्यासक्रम वेळेत पूर्ण होत नसल्यामुळे यापूर्वी २०१० आणि २०१४ या दोन्ही वर्षी ‘झीरो इअर’ जाहीर करून नवीन विद्यार्थ्यांना प्रवेश दिले गेले नव्हते. त्यामुळे २०१० साली प्रवेश परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना २०११ मध्ये प्रवेश मिळाला होता. त्या वेळी प्रवेश परीक्षा द्यायच्या वेळीच लगेच प्रवेश होणार नसल्याचे नवीन विद्यार्थ्यांना माहीत होते, अशी माहिती सूत्रांनी दिली. चालू वर्षी मात्र ‘झीरो इअर’ बद्दल अद्याप कोणतीही घोषणा झालेली नाही, अर्थातच नवीन विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया या वर्षी होणार का, याविषयी माहिती देण्यात आलेली नाही. संस्थेच्या प्रशासनातील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितले, की ‘आता प्रवेश परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्षीच प्रवेश घ्यावा लागेल असेच चित्र आहे, या वर्षी प्रवेश होतील असे दिसत नाही. त्या परिस्थितीत चालू वर्ष देखील ‘झीरो इअर’ ठरेल.’देशभरात २४ केंद्रांवर रविवारी नवीन विद्यार्थ्यांसाठी प्रवेश परीक्षा घेण्यात आली. राज्यात पुणे आणि मुंबईत परीक्षेचे केंद्र होते. एकूण २४०९ विद्यार्थ्यांनी चित्रपट विभागासाठी व ८४७ विद्यार्थ्यांनी दूरचित्रवाणी विभागासाठी प्रवेश परीक्षा दिली. यातून चित्रपट व दूरचित्रवाणी मिळून एकूण ११८ विद्यार्थ्यांची अभ्यासक्रमांसाठी निवड केली जाते.सस्थेच्या संचालक मंडळाच्या अध्यक्षपदी अभिनेते गजेंद्र चौहान यांची नियुक्ती केल्याबद्दल विद्यार्थी संपावर आहेत. संस्थेत २००८ सालचे विद्यार्थी अद्याप शिकत असून त्यांच्या अपूर्ण चित्रपटांच्या मूल्यमापनाच्या घेतलेल्या निर्णयावरून दोन आठवडय़ांपासून वाद सुरू आहे. संस्थेतील असुविधांमुळे या विद्यार्थ्यांचे चित्रपट रखडले असून त्यांचे मूल्यमापन करण्याची ही योग्य वेळ नसल्याचे सांगत विद्यार्थ्यांनी त्याला विरोध केला आहे, तर या विद्यार्थ्यांसाठी संस्थेने अतिरिक्त सुविधा पुरवल्या होत्या, असे संचालकांचे म्हणणे आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 24, 2015 12:19 pm

Web Title: this year no admission for ftii
टॅग : Ftii
Next Stories
1 अडीच महिन्यांपासून आश्रमशाळा निधीच्या प्रतीक्षेत
2 शिक्षक मान्यतेच्या गोंधळाची झाडाझडती
3 कमी विद्यार्थीसंख्येच्या शाळा बंद
Just Now!
X