मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) परिसराकरिता राबविण्यात येणाऱ्या अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेकरिता दोन लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
याकरिता नोंदणी करण्याची मुदत मंगळवारी संपली. एकूण २,००,६४६ विद्यार्थ्यांनी याकरिता नोंदणी केली आहे. सर्वाधिक ५०,७२३ विद्यार्थी वांद्रय़ापुढील पश्चिम उपनगरातील आहेत. त्या खालोखाल ३४,२५५ विद्यार्थी उत्तर मुंबईतील आहेत, तर दक्षिण मुंबईतून २५,९७४ विद्यार्थ्यांनी नोंद केली आहे.
यापैकी सर्वाधिक म्हणजे १,८८,५४८ इतके विद्यार्थी राज्य शिक्षण मंडळाचे आहेत. त्या खालोखाल आयसीएसईचे ७,०९४ विद्यार्थी आहेत, तर सीबीएसईच्या ४,०९२ इतक्या विद्यार्थ्यांनी अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी नोंदणी केली आहे.
या विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी २० जूनला जाहीर करण्यात येणार आहे, तर जागावाटप यादी २२ जूनला जाहीर करण्यात येईल, असे सूत्रांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

वेळापत्रक
* सर्वसाधारण गुणवत्ता यादी- २० जून
* पहिली जागावाटप यादी- २२ जून (सायंकाळी ५ वाजता)
* पहिल्या यादीनुसार प्रवेश- २३ ते २५ जूनपर्यंत (सकाळी १० ते दुपारी ३ दरम्यान)
* दुसरी जागावाटप यादी- ३० जून (सायंकाळी ५ वाजता)
* दुसऱ्या यादीनुसार प्रवेश- १ ते ३ जुलैपर्यंत (सकाळी १० ते दुपारी ३ दरम्यान)
* तिसरी जागावाटप यादी- ६ जुलै (सायंकाळी ५वाजता)
* तिसऱ्या यादीनुसार प्रवेश- ७ आणि ८ जुलै (सकाळी १० ते दुपारी ३ दरम्यान)