संशोधकांसाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने ‘अच्छे दिन’ आणले आहेत. आयोगाकडून संशोधक विद्यार्थी, शिक्षक यांना देण्यात येणाऱ्या विविध शिष्यवृत्ती आणि अभ्यासवृत्तीच्या रकमांमध्ये आयोगाने वाढ केली आहे. शिष्यवृत्तीच्या रकमा जवळपास पन्नास टक्क्य़ांनी वाढल्या आहेत.
 संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून विविध शिष्यवृत्ती आणि अभ्यासवृत्ती देण्यात येतात. विद्यापीठ अनुदान आयोगाकडून त्याची अंमलबजावणी करण्यात येते. यातील जवळपास पंधरा अभ्यासवृत्ती आणि शिष्यवृत्तीच्या रकमांमध्ये आयोगाने वाढ केली आहे. आयोगाच्या नोव्हेंबरमध्ये झालेल्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला.
एमिरेट्स शिष्यवृत्तीची रक्कम ही प्रति महिना २० हजार रुपयांवरून ३१ हजार रुपये करण्यात आली आहे. मानस, नीती, आणि समाजविज्ञान, भाषा यांतील संशोधनाकरता देण्यात येणाऱ्या डॉ. राधाकृष्णन शिष्यवृत्तीची रक्कम पहिल्या वर्षांसाठी प्रतिमहिना २५ हजार रुपयांवरून ३८ हजार ८०० रुपये, दुसऱ्या वर्षांसाठी प्रतिमहिना २६ हजार रुपयांवरून ४० हजार रुपये आणि तिसऱ्या वर्षांसाठी प्रतिमहिना २७ हजार रुपयांवरून ४१ हजार ९०० रुपये करण्यात आली आहे. कनिष्ठ संशोधक म्हणून देण्यात येणारी शिष्यवृत्ती प्रतिमहिना १६ हजार रुपयांवरून २५ हजार रुपये आणि १८ हजार रुपयांवरून २८ हजार रुपये करण्यात आली आहे. या शिवाय डॉ. कोठारी पोस्ट डॉक्टरल फेलोशिप, विवेकानंद शिष्यवृत्ती, राखीव वर्गातील विद्यार्थ्यांना संशोधनासाठी देण्यात येणारी अभ्यासवृत्ती यांच्या रकमांमध्ये आयोगाने वाढ केली आहे.