दिल्ली विद्यापीठातील  चार वर्षे कालावधीमध्ये चालवण्यात येणारा पदवी अभ्यासक्रम विद्यापीठ अनुदान आयोगाने बंद करायला लावल्यानंतर आता पुण्यातील सिम्बायोसिस युनिव्हर्सिटीमधील लिबरल आर्ट्सचा अभ्यासक्रमही बंद करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. मात्र, अद्याप असे कोणतेही पत्र आयोगाकडून मिळाले नसल्याचे सिम्बायोसिसच्या प्रधान संचालिका डॉ. विद्या येरवडेकर यांनी स्पष्ट केले आहे.
दिल्ली विद्यापीठातील चार वर्षे कालावधीमध्ये चालवण्यात येणाऱ्या पदवी अभ्यासक्रमावरून गेल्या महिन्यात वाद झाला होता. आयोगाने हा अभ्यासक्रम बदलण्यास दिल्ली विद्यापीठाला भाग पाडले. त्यानंतर आता पुण्यातील सिम्बायोसिस युनिव्हर्सिटी, बेंगळुरू मधील इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स या संस्थांमधील अभ्यासक्रमही बंद करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. सिम्बायोसिसमध्ये ‘लिबरल आर्ट्स’ चा पदवी अभ्यासक्रम चार वर्षे कालावधीचा आहे. दिल्ली विद्यापीठाच्या वादानंतर आयोगाने सिम्बायोसिसकडे या अभ्यासक्रमाची माहिती मागवली होती. मात्र, अद्याप तरी सिम्बायोसिस विद्यापीठाला अशा प्रकारचे कोणतेही पत्र आयोगाकडून मिळाले नसल्याचे डॉ. येरवडेकर यांनी सांगितले आहे.
डॉ. येरवडेकर म्हणाल्या, ‘लिबरल आर्ट्स शिकण्यासाठी मुले अमेरिकेमध्ये जातात. त्याच स्वरूपाचा अभ्यासक्रम सिम्बायोसिसने सुरू केला असून त्यासाठी स्वतंत्रपणे ‘लिबरल आर्ट्स स्कूल’ सुरू केले आहे. चार वर्षांपासून ते सुरू आहे. जगात अनेक विद्यापीठांमध्ये हा अभ्यासक्रम चार वर्षे कालावधीचाच आहे. या अभ्यासक्रमाची सर्व माहिती आयोगाला देण्यात आलेली आहे. या अभ्यासक्रमाला आयोगाने यापूर्वीच मान्यता दिली आहे.