महागाईत विद्यार्थ्यांना दोन गणवेशासाठी केवळ ४०० रुपये दिले जात असल्याने या पैशात वाढ केली जावी, अशी मागणी होते आहे.जिल्हा परिषदा, स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपालिका तसेच महानगरपालिकेतील इयत्ता पहिली ते आठावीच्या विद्यार्थ्यांना मोफत गणेवश दिला जातो. राज्यातील ४५,६६,५०७ विद्यार्थी मोफत गणवेशाचे लाभार्थी आहेत. त्यात १७,५०,६८९ मुले तर २८,१५,८१८ मुली आहेत. मात्र, या विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी केंद्र सरकार ‘सर्व शिक्षा अभियाना’अंतर्गत १६३ कोटी रुपयांचा निधी देते. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांला दोन गणवेशासाठी केवळ ४०० रुपयेच मिळतात. राज्यातील अनुसूचित जाती, जमातीतील आणि दारिद्रय़ रेषेखाली मुले आणि सर्व संवर्गातील मुलींना ही मोफत गणवेशाची योजना लागू आहे. पण, वाढत्या महागाईत ४०० रुपयात दोन गणवेशासाठीचे कापड ते काय घेणार आणि त्याची शिलाई ती काय भागवणार असा प्रश्न पालकांसमोर आहे. त्यामुळे ही रक्कम वाढवून द्यावी, अशी मागणी शिक्षक आमदार रामनाथ मोते यांनी केली आहे.