उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांच्या वादग्रस्त महाविद्यालयाच्या चौकशी अहवालाबाबत मुंबई विद्यापीठ प्रशासन मूग गिळून गप्प असल्याने हा अहवाल दडपण्याचा तर प्रकार नाही, अशी चर्चा आता जोर धरू लागली आहे. पात्रता निकष धाब्यावर बसवून नवी मुंबईतील एका निवासी संकुलात हे महाविद्यालय चालविले जात आहे.
महाराष्ट्र विद्यापीठ कायदा, विद्यापीठ अनुदान आयोग यांनी ठरवून दिलेल्या निकषांची पूर्तता केलेली नसतानाही या महाविद्यालयाला मान्यता कशी मिळाली यावर ‘लोकसत्ता’ने वृत्त प्रकाशित करून प्रकाश टाकला होता. टोपे यांच्या ‘मत्सोदरी शिक्षण संस्थे’तर्फे सिलिकॉन टॉवर या निवासी इमारतीत वाणिज्य महाविद्यालय चालविले जाते. त्यानंतर ‘महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेने’ने (मनविसे) राज्यपाल, मुख्यमंत्री, मुंबई विद्यापीठाकडे तक्रार करून हे महाविद्यालय बंद करावे व संबंधित विद्यार्थ्यांना अन्य सोयीसुविधांनी युक्त महाविद्यालयात वर्ग करण्यात यावे, अशी मागणी केली.
विद्यापीठाने वाणिज्य शाखेचे अधिष्ठाता डॉ. मधू नायर यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय चौकशी समिती नेमून महाविद्यालयाने पात्रता निकषांची पूर्तता केली आहे का याची तपासणी केली. ही समिती नेमून दोन-तीन महिने झाले. समितीने आपला अहवाल विद्यापीठाला सादर करूनही बरेच दिवस लोटले आहेत. परंतु, या अहवाल अजूनही गुलदस्त्यातच आहे. विद्यापीठाने लवकरात लवकर अहवाल जाहीर करावा, अशी मागणी ‘महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेने’ने (मनविसे) सरचिटणीस गजानन काळे यांनी केली. राजकीय दबावामुळे विद्यापीठ हा अहवाल दडपण्याच्या प्रयत्नात आहे. संबंधित महाविद्यालयावर कारवाई न झाल्यास मुंबई विद्यापीठावर मोर्चा काढण्यात येईल, अशा इशारा मनविसेचे उपाध्यक्ष संतोष गांगुर्डे यांनी दिला आहे.