‘तरूणांना उच्चशिक्षणाची दारे खुली करून देण्याबरोबरच विद्यापीठे समाजाचा विकास करणारी शक्तीस्थाने बनली पाहिजेत. ही जबाबदारी पेलण्यास आपण सक्षम आहोत का हे ध्यानात ठेवून विद्यापीठांनी स्वत:चे आत्मपरीक्षण करावे,’ असे प्रतिपादन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी येथे केले.
मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट येथील दीक्षांत सभागृहात रविवारी सकाळी झालेल्या १५४ व्या पदवीदान समारंभात ते बोलत होते. ‘शिक्षणाचे उद्दीष्ट केवळ चांगली नोकरी आणि उत्पन्न मिळविणे नाही. तर तुम्ही मिळविलेल्या ज्ञानाचा समाज आणि देशाच्या उन्नतीसाठी उपयोग झाला पाहिजे,’ असे आवाहन त्यांनी उपस्थित नवपदवीधरांना केले. तर ‘आपली पारंपरिक मूल्ये आणि पाश्चिमात्य संस्कृती यांच्या द्वंद्वात अडकलेल्या भावी पिढीला योग्य मार्गदर्शन करणारी विद्यापीठे आपल्याला हवी आहेत,’ अशी अपेक्षा त्यांनी विद्यापीठांकडून व्यक्त केली.
‘स्मार्ट फोन आणि टॅबलेटमुळे कल्पना या विचारांच्या वेगाने पसरत आहेत. या साधनांमुळे जगात घडून येणाऱ्या बदलांचा वेग आपल्याला साधायचा आहे. तो दिवस दूर नाही की ज्यात ज्ञानाचे एकसंध असे जाळे नव्या तंत्रज्ञानामुळे जोडले जाईल. त्यामुळे, अध्यापन आणि अध्ययनाच्या तंत्रातही आमूलाग्र बदल होईल. या बदलांमुळे भविष्यात वर्गातील व्याख्यान आणि लिखित स्वरूपात विचार पाहोचविणे या बाबी गौण ठरण्याची शक्यता आहे. प्राध्यापक, व्याख्याते, शिक्षक तंत्रज्ञानाच्या विविध साधनांच्या आधारे विचारांची प्रक्रिया सुलभ करण्यास मदत करणारा दुवा ठरतील. त्यासाठी आधी शिक्षकांनाही या नव्या तंत्रप्रणालींशी जुळवून घेण्याची जबाबदारी पेलावी लागेल,’ अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
‘जगातील महासत्तांच्या बरोबरीला भारताला यायचे असेल तर आधी या देशातील तरुणांना सक्षम केले पाहिजे. यासाठी तंत्रज्ञानामुळे क्षणाक्षणाला आकुंचणाऱ्या जगात टिकाव धरण्यासाठी लागणारी साधने त्यांना पुरविली पाहिजेत. म्हणूनच आपल्या समाजाच्या गरजेप्रमाणे ज्ञानाची निर्मिती आणि कृतीशील कौशल्ये आपण आपल्या विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करू शकू का याचा विचार विद्यापीठांमधून व्हायला हवा. विद्यापीठांनी या दृष्टीने आत्मपरिक्षण करावे,’ असे आवाहन त्यांनी केले.
‘शिक्षणव्यवस्थेचा विस्तार हे आव्हान आपण पुरेसे पेलले आहे. पण, यापुढे आपल्याला शिक्षणाच्या दर्जावर लक्ष केंद्रीत करावे लागणार आहे. दर्जा उंचावणाऱ्या प्रत्येक उपक्रमांना आपले सरकार मदत करेल,’ असे आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले. यावेळी राष्ट्रपती, मुख्यमंत्री आणि राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी विविध विभागांतून प्रथम आलेल्या ५१ विद्यार्थ्यांना सुवर्ण पदके बहाल केली. कुलगुरू राजन वेळुकर यांनी विद्यापीठाच्या कामाचा आढावा घेतला.