चिंतनप्रक्रियेमध्ये तुम्ही जे वाचता त्याचे अवलोकन (Interpretation) तुम्हाला करता आले पाहिजे. भोवतालच्या भौगोलिक, आर्थिक, सामाजिक पर्यावरणाशी तुम्हाला रिलेट होता यायला हवे. उदा. तुम्ही जर भारताचा भूगोल अभ्यासत असाल तर तुमची विचारप्रणाली पुढीलप्रमाणे प्रकट झाली पाहिजे- तुम्ही जिथे राहता त्या प्रदेशाचे हवामान कसे आहे, तिथे उद्योगधंदा होतो की शेती केली जाते, जर शेती होते तर कोणत्या पिकांना प्राधान्य मिळते, जगात इतरत्र अशी पिके कोणती राष्ट्रे घेतात, या पिकांवर कोणत्या आजारांचे सध्या आक्रमण होते, त्यामागे बदलत्या वातावरणाचा प्रभाव आहे का, पर्यावरणाच्या या बदलामागे विज्ञानाची नेमकी कोणती कारणमीमांसा आहे, ही वातावरणाची हानी थांबविणारी एखादी आंतरराष्ट्रीय संघटना आहे का, या संघटनेचे मुख्यालय कोणत्या देशात आहे, त्या देशाचे भारताबरोबर संबंध कोणत्या प्रकारचे आहेत, या देशात सध्या एखादी महत्त्वाची घटना घडली आहे का, भारताबरोबर या देशाने अलीकडे एखादा वाणिज्य करार केला आहे का, त्या करारामध्ये कोणत्या ठळक गोष्टींना प्राधान्य दिले आहे..’ अशा प्रकारचा आंतरशाखीय रचना असलेला अभ्यास तुम्हाला तुमच्या वाचन-लेखन-चिंतनप्रक्रियेतून जमला पाहिजे.
वरीलप्रमाणे आकलनकौशल्य मिळविल्यानंतर विद्यार्थ्यांकडे महत्त्वाची साधने असतात- ती म्हणजे वेळ आणि पैसा. आयोगाची परीक्षा ही वर्षभर चालत असल्याने आणि या परीक्षेसाठी किमान वर्षभर सातत्याने अभ्यास करायला हवा. आयोगाने नेमलेल्या अभ्यासक्रमाची आणि गतवर्षीच्या प्रश्नपत्रिकांची झेरॉक्स विद्यार्थ्यांनी सतत आपल्याजवळ बाळगावी. संदर्भ पुस्तकांची यादी दिलेली नसल्याने अभ्यासक्रम आणि प्रश्नपत्रिका यांच्या सूक्ष्म निरीक्षणातूनच अभ्यासाची योग्य दिशा सापडते. www.upsc.gov.in या साइटवर तुम्ही अभ्यासक्रम आणि प्रश्नपत्रिका डाउनलोड करू शकता. विद्यार्थ्यांनी किमान रोज अर्धा तास तरी प्रश्नपत्रिका अभ्यासाव्यात आणि त्यानंतरच मोजकी पुस्तके आणि त्यातील नेमका भाग वाचण्यासाठी घ्यावा. पुस्तके आणि वाचन यातील ग्यानबाची मेख अशी आहे की बाजारात यूपीएससीची अनेक पुस्तके उपलब्ध आहेत. त्यातील योग्य आणि आवश्यक शैक्षणिक साहित्य आपल्याला निवडता यायला हवे, ज्यामुळे आपला वेळ आणि पैसा दोन्हींची बचत होईल.
पुस्तके अभ्यासणे हेदेखील कौशल्याचे काम आहे. एखादे पुस्तक हातात घेतल्यानंतर सर्वप्रथम त्यातील प्रकरणांवर कोणते प्रश्न येऊन गेलेत याची नोंद करावी. धडा वाचताना त्या प्रश्नांची उत्तरे कुठे सापडत आहेत का, याचा शोध घ्यावा आणि वाचनानंतर अशी काही प्रश्नमालिका तयार होते का, याचा विचार करावा, त्या वस्तुनिष्ठ प्रश्नांना लिहून काढावे.
पुस्तके अभ्यासताना ज्याप्रमाणे वेळेचे नियोजन आवश्यक आहे, त्याप्रमाणे परीक्षेच्या तिन्ही टप्प्यांसाठी वेळेचे नियोजन करावे लागते. पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा यांच्यामध्ये चार ते पाच महिन्यांचे अंतर असल्याने विद्यार्थ्यांनी पूर्वपरीक्षेच्या अभ्यासाने तयारी सुरू करू नये, तर प्रथमत: मुख्य परीक्षेचा किमान ५० टक्के अभ्यास तरी पूर्ण करावा. आणि मुख्य परीक्षेनंतरचा वेळ मुलाखतीच्या तयारीसाठी राखून ठेवावा.
तुम्ही जर कॉलेजात शिक्षण घेत असाल आणि अद्याप पदवीच्या परीक्षेला बसले नसाल, तरी वेळ दवडू नका. रोजच्या वेळापत्रकात यूपीएससीचा एक-दोन तास तरी अभ्यास करा. ‘एनसीइआरटी’ची आठवी ते बारावीची शालेय, महाविद्यालयीन पुस्तके मन लावून वाचा. ‘लोकसभा’ वृत्तवाहिनीवरील कार्यक्रम बघत राहा. आकाशवाणीवरच्या इंग्रजी, हिंदी, मराठी बातम्या ऐका. यामुळे तुमचे सामान्यज्ञान अद्ययावत होत राहील. प्रशासकीय सेवा परीक्षेचा बराचसा भाग चालू घडामोडींशी संबंधित असतो.
तुमचे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झालेले असेल आणि तुम्ही जर पूर्णवेळ परीक्षेसाठी अभ्यास करणार असाल, तर दिवसाचे १२-१४ तास अभ्यास करण्याची मानसिक तयारी ठेवा. कदाचित सुरुवातीला तुम्हाला इतक्या वेळ बसण्याचा कंटाळा येईल, कदाचित तुम्हाला एकाग्रता साधणार नाही. परंतु लक्षात ठेवा, ही परीक्षा निश्चयाची कसोटी घेणारी आहे. सरावाने आणि निरंतन प्रयत्नांनी तुम्ही असाध्य ते साध्य करू शकता. यूपीएससी परीक्षेत यशस्वी होण्यासाठी तुम्हाला कासवाची निष्ठा आणि सशाची ऊर्जा दोन्ही प्रयत्नांनी मिळवावी लागेल. तरच आयएएस/ आयपीएस/ आयएफएस होण्याची ही शर्यत तुम्ही निर्विवादपणे जिंकू शकाल, तुमच्या भावी यशासाठी तुम्हाला मन:पूर्वक शुभेच्छा!