मराठी माध्यमाच्या शाळांमध्येही आता उर्दू शिकता येणार आहे. हिंदी आणि उर्दू अशा संयुक्त अभ्यासक्रमाला शिक्षण विभागाने परवानगी दिली असून या वर्षीपासून राज्यातील शंभर शाळांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर ही योजना राबवण्यात येणार आहे.

देशात २००५ मध्ये लागू झालेल्या राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडय़ानुसार बहुभाषिक अध्ययनाचे सूत्र अवलंबण्यात आले आहे. राज्यात मराठी माध्यमाच्या शाळांमध्येच अनेक उर्दू भाषक विद्यार्थी शिक्षण घेतात. आतापर्यंत मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये त्रिभाषा सूत्र आहे. त्यानुसार मातृभाषा म्हणजेच मराठी, इंग्रजी आणि हिंदूी असे तीन विषय शाळेत शिकवण्यात येत होते. मात्र त्यामुळे उर्दू भाषक विद्यार्थी आपल्या मातृभाषेच्या शिक्षणापासून वंचित राहात होते. त्या पाश्र्वभूमीवर आता मराठी माध्यमाच्या शाळांमध्येही उर्दू भाषेचे शिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सहवी आणि सातवीच्या वर्गाना हिंदी आणि उर्दू असा संयुक्त विषयाचाही पर्याय मिळणार आहे. त्यानुसार आठवडय़ातील दोन तास हिंदी आणि दोन तास उर्दूचे शिक्षण विद्यार्थ्यांना दिले जाईल. यासाठी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये वापरण्यात येणारे संयुक्त उर्दूचे पाठय़पुस्तक वापरण्यात येणार आहे. ज्या शाळेत उर्दू भाषा शिकण्याची इच्छा असणारे किमान पाच विद्यार्थी असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे ज्या शाळांच्या परिसरात उर्दू माध्यमाची शाळा आहे आणि उर्दू शिकवण्यासाठी त्यातील शिक्षक तासिका तत्त्वावर मिळू शकतील अशा शाळेला संयुक्त उर्दू घेता येणार आहे. मराठी माध्यमाच्या शाळेत उर्दू विषय शिकवण्यासाठी शिक्षकांची नवी पदे निर्माण केली जाणार नाहीत, असेही शासनाने स्पष्ट केले आहे.