परीक्षेच्या तोंडावर घोळ घालण्याची परंपरा महाराष्ट्र ‘राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा’ने यंदा बारावीच्या परीक्षेतही कायम ठेवल्यामुळे विज्ञानाची परीक्षा देणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले होते. बोर्डाकडून विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या लॉग बुकमध्ये चुका असल्यामुळे भौतिक, रसायन व गणिताची उत्तरेच चुकणार होती. मनसेने याप्रकरणी केलेल्या पाठपुराव्यामुळे मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत पांडे यांनी विद्यार्थ्यांना स्वत:ची प्रमाणित लॉगबुक वापरण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे.
भौतिक, गणित व रसायनशास्त्रातील जटिल गणितीय जाळे सोडविण्यासाठी विद्यार्थ्यांना लॉग बुकचा वापर करावा लागतो. दरवर्षी मंडळाकडून परीक्षेच्या वेळी लॉगबुक पुरविण्यात येते. यंदा लॉग बुकच्या छपाईत बऱ्याच चुका झाल्याचे मंडळाच्या लक्षात आले. त्यामुळे, त्यांनी या चुकांची दुरुस्ती करणारे शुद्धिपत्रक काढून ते परीक्षा केंद्रांवर पाठविण्यात आले. लॉग बुकसोबत विद्यार्थ्यांना हे शुद्धिपत्रकही देण्यात यावे, असे केंद्र संचालक व उपसंचालकांना द्यावे, असे मंडळाने कळविले.
काही जागरूक पालकांना ही बातमी समजताच त्यांनी मनविसे व शिवसेनेच्या विद्यार्थी संघटनांशी संपर्क साधला आणि मनसेचे नवी मुंबई शहर प्रमुख गजानान काळे व मनविसे उपाध्यक्ष सुधाकर तांबोळी, संतोष गांगुर्डे, साईनाथ दुर्वे हे थेट बोर्डाच्या कार्यालयावर धडकले. सुट्टी असल्यामुळे त्यांनी अध्यक्ष लक्ष्मीकांत पांडे तसेच संबंधित अधिकाऱ्यांना दूरध्वनी करून भेटण्याची विनंती केली. त्यानुसार अध्यक्ष व अधिकारी साडेतीनच्या सुमारास कार्यालयात आले. तेथे मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी बोर्डाच्या चुकीचा दोन लाख मुलांना थेट फटका बसू शकतो हे निदर्शनास आणून विद्यार्थ्यांना त्यांचे स्वत:चे लॉगबुक वापरू देणे अथवा आगामी तीन दिवसात दुरुस्तीसह लॉगबुक नव्याने छापण्याचे पर्याय ठेवले.
एवढय़ा कमी कालावधीत छपाई होणे शक्य नाही तसेच विद्यार्थ्यांनी शुद्धिपत्र तपासत उत्तरपत्रिका लिहिण्यातील अडचण मान्य करून अध्यक्ष पांडे यांनी विद्यार्थ्यांना प्रमाणित म्हणजे लॉगबुक वापरण्यास परवानगी देणारे पत्रक काढण्याचे मान्य केले. ‘लोकसत्ता’शी बोलतानाही त्यांनी ही बाब त्यांनी मान्य केली. एकीकडे सीबीएससी व आयसीआयसीच्या विद्यार्थ्यांना सढळ हाताने गुण मिळत असताना बोर्डाच्या चुकीचा फटका विद्यार्थ्यांना बसू देणार नाही, याबाबत आग्रही असलेल्या मनसेमुळे लाखो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.