निसर्गप्रेम, स्वच्छता, मातृप्रेम, श्रमप्रतिष्ठा, बंधुभाव, समानता इत्यादी मूल्यांची प्रसंगोपात विविध कृतींतून रुजवण घालण्याचे काम दहिसरच्या ‘शैलेंद्र एज्युकेशन सोसायटी’च्या शाळेत केले जाते. या शाळेविषयी..
शैलेंद्र एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत अनेक उपक्रमांतून मूल्यशिक्षण देण्याचा प्रयत्न सातत्याने केला जात असतो. याची सुरुवात जून महिन्यापासूनच होते. पावसाचे आगमन झाल्यानंतर तृषार्त धरित्रीचे व निसर्गाचे रूप हळूहळू पालटायला लागते. अशा वेळी आपल्या सभोवतालचा निसर्ग कसा बदलतो आहे, याचे निरीक्षण करण्यास आम्ही मुलांना प्रवृत्त करतो. निसर्गाचे हे हिरवेपण टिकवून ठेवायचे असेल तर प्रत्येकाने एक तरी झाड लावले पाहिजे. यासाठी आम्ही निसर्गपूजा करून मुलांनी लावलेल्या झाडांचे प्रदर्शन भरवतो. यानिमित्ताने विविध घोषवाक्यांचा संग्रह करण्यास प्रवृत्त करतो. विविध झाडांचे विविध उपयोग लिहिण्यास सांगतो. त्यामुळे मुलांची संग्राहक वृत्ती वाढते. प्रदर्शनात मुलांना विविध झाडे पाहता येतात. मुले त्यांचे निरीक्षण करून उपयुक्तता जाणून घेतात. त्यांची वैज्ञानिक दृष्टी वाढीस लागते. श्रमप्रतिष्ठा, सहकार्याची वृत्ती या मूल्यांची वाढ होते.
जून महिन्यात शाळेच्या पहिल्या दिवसापासूनच मुलांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले जाते. आपला वर्ग, शाळा व परिसर आपण का स्वच्छ ठेवला पाहिजे हे मुलांना कळल्यामुळे मुले आपला वर्ग दररोज स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करतात. या कामी मुलगा, मुलगी असा भेदभाव न करता सर्वाना कामाला लावले जाते. यामुळे स्त्री-पुरुष समानता, श्रमप्रतिष्ठा ही मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये आपोआपच रुजतात. मुले घरीही आपल्या आईला या कामी मदत करतात.
‘मातृदिना’च्या दिवशी मुलांकडून त्यांच्या आईसाठी भेटकार्ड बनवून घेतले जाते. त्यात आईची महती सांगणारी छानशी वाक्ये शिक्षक मुलांकडून लिहून घेतात व ते कार्ड आपल्या आईला भेट देऊन तिला नमस्कार करून तिचा आशीर्वाद घेतात. त्यामुळे मुले व आई यांच्यातील नाते अधिक दृढ होण्यास मदत होते. रक्षाबंधनाच्या वेळी मुलामुलींकडून राख्या बनवून घेतो. या राख्या टाकाऊ वस्तूंपासून बनवितात. वर्गातील मुले-मुली एकमेकांना राखी बांधतात. नीटनीटकेपण, स्त्री-पुरुष समानता व संवेदनशीलता ही मूल्ये त्यांच्या अंगी योग्य प्रकारे रुजण्यास यामुळे मदत होते.
‘क्रांतिदिना’निमित्त ९ ऑगस्टला शाळेच्या आजूबाजूच्या परिसरांत असलेल्या पोलीस स्टेशन, बँक, पोस्ट ऑफिस, रेल्वे स्थानक, दूरध्वनी कार्यालय, भारत गॅस येथील कर्मचाऱ्यांना भेटून त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते. यासाठी चौथीच्या वर्गातील मुले सुंदर भेटकार्डे तयार करतात. भेटकार्डावर त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारे छानसे वाक्य लिहिलेले असते. सर्व शिक्षक व मुले शाळा सुरू होण्याआधी नेमून दिलेल्या उपरोक्त स्थळांना भेट देऊन तेथील कर्मचाऱ्यांना गुलाबपुष्प व भेटकार्डे देऊन त्यांचे अभीष्टचिंतन करतात. मुलांमधील सौजन्यशीलता पाहून तेथील सर्वच कर्मचारी या बालचमूचे मुक्तकंठाने कौतुक करतात.
मुलांना अभ्यासाकरिता प्रोत्साहन देण्यासाठी दहावीच्या परीक्षेत शाळेतून पहिल्या येणाऱ्या आमच्या विद्यार्थ्यांला १५ ऑगस्टला राष्ट्रध्वज फडकाविण्याचा मान दिला जातो. त्यामुळे इतर विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळते. त्यामुळे अभ्यास करण्यासाठी लागणारी चिकाटी, वक्तशीरपणाची जडणघडण त्यांच्या मनात सुरू होते.
बालदिनाच्या दिवसी आम्ही मुलांचे वाढदिवस साजरे करतो. त्या दिवशी सर्व मुले रंगीत कपडे घालून येतात. येताना आपल्यासोबत एक मूठ सुका मेवा आणतात. हा सुका मेवा एकत्र करून सर्वाना वाटला जातो. मेव्याचे महत्त्व मुलांना पटवून दिले जाते. याशिवाय चौथीच्या मुलांसाठी दर वर्षी संस्कार शिबीर आयोजित केले जाते. यात परिपाठ, झेंडा कवायत, चित्रकला, कार्यानुभव, प्रश्नमंजूषा, व्याख्याने अशा अनेक उपक्रमांचे आयोजन केले जाते. या उपक्रमासाठी बाहेरून तज्ज्ञ मार्गदर्शक बोलावून त्यांच्याकडून विद्यार्थ्यांना निरनिराळ्या कलाकृती शिकविल्या जातात. यात त्यांना नवनिर्मितीचा आनंद मिळतो. त्याचबरोबर स्वावलंबन, नीटनेटकेपणा व श्रमप्रतिष्ठेचे महत्त्वही समजते. अशा अनेक उपक्रमांतून विद्यार्थ्यांना मूल्यशिक्षण देण्याचा प्रयत्न केल्यास समाजात आपण कसे वागावे याचे बीज त्यांच्या मनात नकळत रुजते.
 शिक्षिका, शैलेंद्र एज्युकेशन सोसायटीची मराठी प्रा. शाळा, दहिसर.
संपर्क- ९९६७३८३०९१.

Vidya Prabodhini students from Kolhapur top in the UPSC final result
युपीएससीमध्ये कोल्हापूरचा झेंडा; विद्या प्रबोधिनीच्या विद्यार्थांची अंतिम निकालात बाजी
Simran Thorat first woman merchant navy officer
शिक्षणासाठी पालकांनी जमीन विकली, पुण्याच्या सिमरन थोरातने मर्चंट नेव्ही क्षेत्रात मिळला ‘हा’ बहुमान
piyush goyal
लखलखत्या तरुण तेजांकितांचा आज गौरव; केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियूष गोयल प्रमुख अतिथी
nagpur, couple, Kidnapped, Young Engineer girl, Inspired by Web Series, police arrested, accused, marathi news,
वेबसिरीज बघून आखला अपहरणाचा कट; तरुणीचे अपहरण, प्रेमीयुगुल…