चुनाभट्टीच्या ‘वसंतदादा पाटील अभियांत्रिकी महाविद्यालया’च्या पदवी आणि पदविका अशा दोन्ही अभ्यासक्रमांची मान्यता ‘अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदे’ने (एआयसीटीई) काढून घेतली आहे. त्यामुळे २०१३-१४ या वर्षांकरिता या महाविद्यालयाला प्रवेश प्रक्रिया करता येणार नाहीत. आश्चर्य म्हणजे याच महाविद्यालयाच्या पदविका अभ्यासक्रमांची प्रवेशक्षमता ‘एआयसीटीई’ने २०१३-१४ या शैक्षणिक वर्षांकरिता वाढवून दिली होती. एकीकडे प्रवेशक्षमता वाढवायची आणि दुसरीकडे थेट मान्यताच काढून घ्यायची हा प्रकार एआयसीटीईच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे.
अपुऱ्या शैक्षणिक व पायाभूत सुविधांवर बोट ठेवत या महाविद्यालयाला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. या नोटिशीचा समाधानकारक खुलासा करण्यात अपयश आल्याने संस्थेची मान्यता काढून घेण्यात आली आहे, असे एआयसीटीईने २० जूनला पाठविलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे. मात्र, याच महाविद्यालयाला नव्या शैक्षणिक वर्षांत पदविका अभ्यासक्रमासाठी जागा वाढवून देण्यात आल्या होत्या. जागा वाढवून देताना संबंधित महाविद्यालयातील शैक्षणिक व पायाभूत सुविधांची पाहणी करावी लागते. वाढीव जागांच्या तुलनेत संबंधित महाविद्यालयाने या सुविधा वाढविल्या आहेत का, याचा आढावा या निमित्ताने घेतला जातो.
त्याप्रमाणे एआयसीटीईने नेमलेल्या समितीने महाविद्यालयाची पाहणी केली. संबंधित महाविद्यालयात पुरेशा सुविधा असल्याचे या पाहणीत नमूद करण्यात आल्याने पदविका अभ्यासक्रमाची प्रवेशक्षमता वाढविण्यात आली. पण, महिनाभरात आणखी एका समितीने महाविद्यालयाला भेट देऊन पाहणी करत नकारात्मक शेरा दिला. या समितीच्या पाहणीच्या आधारे एआयसीटीईने महाविद्यालयाला नोटीस पाठविली. पण, महिनाभरात असे काय घडले की ज्यामुळे हे महाविद्यालय अभियांत्रिकीचे अभ्यासक्रम चालविण्यास अपात्र ठरावे, असा प्रश्न उपस्थित होत आह़े
एका बाजूला प्रवेशक्षमता वाढवून देण्यास पात्र ठरणारे महाविद्यालय एकाच महिन्यात तो अभ्यासक्रमच चालविण्यास अपात्र ठरावे हा प्रकार एआयसीटीईच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे. एआयसीटीईने मान्यता काढून घेतल्याने तंत्रशिक्षण संचालनालयाने या महाविद्यालयाचे नाव अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतून (कॅप) वगळले आहे. या सगळ्या प्रकरणाविरोधात संस्था उच्च न्यायालयात दाद मागण्याच्या तयारीत आहे.