पूर्व उपनगराचा शैक्षणिक व सामाजिक चेहरा म्हणून ख्याती असलेल्या ‘वझे-केळकर एज्युकेशन ट्रस्ट’च्या ‘वि. ग. वझे-केळकर महाविद्यालया’ला यंदा ३० वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने ५ आणि ६ फेब्रुवारीला विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महाविद्यालयाच्या प्रांगणात होणाऱ्या या कार्यक्रमात राज्यपाल के. शंकरनारायणन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
 ‘जी.डी. तथा भाऊसाहेब केळकर’ आणि ‘आर. ए. कुलकर्णी’ यांच्या स्मृतीनिमित्त व्याख्यानमालेचे उद्घाटनही राज्यपालांच्या हस्ते होणार आहे. पहिले व्याख्यान दिल्लीच्या ‘आयआयटी’चे संचालक प्रा. आर. के. शेवगांवकर ‘उच्च शिक्षणात तंत्रज्ञानाचा वापर’ या विषयावर तर ६ फेब्रुवारीला ‘केंद्रीय नियोजन आयोगा’चे सदस्य डॉ. नरेंद्र जाधव ‘युवाशक्ती आणि भारतीय अर्थव्यवस्था’ या विषयावर देतील.