अमेरिकेत नॅनो इंजिनीयरिंगमध्ये पीएचडी के ल्यानंतर आपल्या ज्ञानाचा फायदा येथील विद्यार्थ्यांना व्हावा हा हेतू बाळगून व्हीजेटीआयमध्ये परतलेल्या डॉ. दत्ताजी शिंदे या अध्यापकांना प्राध्यापकाच्या पदोन्नतीत अन्यायाने डावलण्यात आल्यामुळे अखेर त्यांनी आता उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्यावरील अन्यायाविरोधात उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दाद मागूनही ती मिळत नसल्यामुळे उपोषमाला बसण्याशिवाय आपल्याकडे पर्याय नसल्याचे डॉ. शिंदे यांनी सांगितले.

डॉ. अब्दुल कलाम, डॉ. काकोडकर डॉ. जयंत नारळीकर, डॉ. माशेलकर यांच्या परंपरेचे पाईक बनण्याचे स्वप्न बागळून अमेरिकेचे ‘ग्रीन कार्ड’ व ७० हजार डॉलर वेतनाच्या नोकरीवर पाणी सोडून भारतात ‘व्हीजेटीआय’मध्ये अध्यापकाच्या नोकरीत रुजू होण्यासाठी आलेल्या डॉ. दत्ताजी शिंदे यांना वरिष्ठांनी पदोन्नतीत डावलले. परिणामी त्यांना न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याची वेळ आली. २०१४मध्येच प्राध्यापक पदासाठी पदोन्नती मिळणे अपेक्षित असताना परस्पर प्राध्यापकाच्या पदासाठी जाहिरात काढण्यात येणे व त्यातही मुलाखतीत डावलणे यामुळे ‘मेक इन इंडिया’ नेमका कोणासाठी, असा सवाल व्हीजेटीआयमधील अध्यापकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

डॉ. शिंदे यांच्याप्रमाणेच आणखीही काहीजणांना पदोन्नतीत डावलण्यात आल्याचे येथील अध्यापकांचे म्हणणे आहे.