News Flash

बारावीच्या गोंधळाचे खापर मंडळाकडून शिक्षकांच्या माथी

अकरावी-बारावीचा सुधारित अभ्यासक्रम २०१०सालीच राज्य शिक्षण मंडळाने जाहीर केला होता. त्याचवेळी प्रत्येक शिक्षकाने उपलब्ध तासिका व अभ्यासक्रम शिकविण्यासाठी लागणारा वेळ यांचे योग्य नियोजन करून अभ्यासक्रम

| January 17, 2013 12:05 pm

अकरावी-बारावीचा सुधारित अभ्यासक्रम २०१०सालीच राज्य शिक्षण मंडळाने जाहीर केला होता. त्याचवेळी प्रत्येक शिक्षकाने उपलब्ध तासिका व अभ्यासक्रम शिकविण्यासाठी लागणारा वेळ यांचे योग्य नियोजन करून अभ्यासक्रम पूर्ण करणे आवश्यक होते, असा खुलासा करत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीच्या अभ्यासक्रमावरून विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या तक्रारींना कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना जबाबदार धरले आहे.
सुधारित अभ्यासक्रमानुसार कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना वेळेतच प्रशिक्षण देण्यात आले होते. शिक्षकांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अभ्यासक्रमाचे नियोजन करावे, असे प्रशिक्षणादरम्यान सांगण्यात आले होते, असेही मंडळाने स्पष्ट केले आहे.
अभ्यासक्रम पूर्ण करण्यास पुरेसा वेळ न मिळाल्याने अनेक विषयांना न्याय देता आला नाही, असे शिक्षकांचे म्हणणे आहे. रसायनशास्त्राच्या काही शिक्षकांकडून तर अभ्यासक्रमच कमी करण्याची मागणी होत आहे. पण, बारावीचा अभ्यासक्रम कमी करण्याची मागणी मंडळाने फेटाळून लावली आहे. कारण, सर्व राज्यांनी गणित व विज्ञान विषयाचा देशपातळीवर एकच अभ्यासक्रम मान्य केला आहे. यात महाराष्ट्राला मागे राहून चालणार नाही. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना देशपातळीवरील परीक्षेत यश मिळविता यावे या दृष्टीने नवीन अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे, असे सांगत परीक्षेची तयारी पूर्ण झाली असून या टप्प्यावर वेळापत्रकात बदल करता येणार नाही, असेही मंडळाने स्पष्ट केले आहे.
रसायनशास्त्राच्या पृष्ठसंख्येचा बाऊ
रसायनशास्त्राच्या पाठय़पुस्तकांची पृष्ठसंख्या जास्त असली तरी त्याची कारणे वेगळी आहेत. पाठय़पुस्तक एकाच स्तंभात छापणे, शास्त्रज्ञांची माहिती, जास्तीची सोडविलेली उदाहरणे, विद्यार्थ्यांना सोडविण्यासाठी दिलेले प्रश्न व उदाहरणे, पाठय़ाचा सारांश, बहुपर्यायी प्रश्न, उपघटकांमध्ये विद्यार्थ्यांना स्वतंत्र विचार करण्यासाठी दिलेले प्रश्न, प्रत्येक उपघटक सर्व स्तरातील विद्यार्थ्यांना स्वत वाचून कळावा या दृष्टीने उपघटकाचे स्पष्टीकरण साध्य, सोप्या भाषेत उदाहरणे देऊन केलेले आहे. पण, काही शिक्षक पुस्तकांची पृष्ठसंख्या जास्त झाल्याचे सांगून विद्यार्थ्यांना संभ्रमात टाकत आहेत, असे मंडळाचे म्हणणे आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 17, 2013 12:05 pm

Web Title: weight of twelve mismanagement on the teacher
Next Stories
1 ‘त्या’महाविद्यालयांचे नेमके चुकले कुठे?
2 खासगी वैद्यकीयच्या रद्द प्रवेशांच्या जागा नव्याने भरणार?
3 आदित्य दंत महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना मुख्यमंत्र्यांचा दिलासा
Just Now!
X