प्रवेशासाठी नेमून दिलेले वेळापत्रक न पाळणे, प्रवेश प्रक्रियेत अपारदर्शकता ठेवणे, रिक्त जागांची माहिती दडविणे, विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी समान संधी नाकारणे, गुणवत्ता व आरक्षणाचे नियम डावलून प्रवेश करणे आदी कारणांमुळे राज्यातील १७ खासगी वैद्यकीय व दंत वैद्यकीय महाविद्यालयांवर प्रवेश रद्द होण्याची नामुष्की ओढवली आहे.
प्रवेश नियंत्रण समितीला पुणे, औरंगाबाद आणि नागपूर या विभागीय चौकशी समित्यांनी सादर केलेल्या अहवालात प्रत्येक महाविद्यालयाने दुसऱ्या फेरीनंतर प्रवेश करताना केलेल्या गैरप्रकारांवर नेमके बोट ठेवण्यात आले आहे. यापैकी बहुतांश महाविद्यालयांनी नियमानुसार रिक्त जागांची माहिती प्रसिद्ध केलेली नाही. तर अनेकांनी प्रवेश फेऱ्यांमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीची माहिती व्यवस्थित जतन केली नव्हती. यापैकी पुण्याच्या एमआयएमईआर या महाविद्यालयाने तर रात्री १० वाजता प्रवेश केला आहे. अनेकांनी आरक्षणाचे नियम धाब्यावर बसवून प्रवेश केले आहेत. काही महाविद्यालये तर इतकी मुजोर आहेत की त्यांनी चौकशीसाठी आलेल्या समित्यांनी मागितलेली माहिती देण्यासही नकार दिला. यापैकी साताऱ्याच्या ‘इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्स अ‍ॅण्ड रिसर्च’ या महाविद्यालयाने तर वर प्रवेश नियंत्रण समितीलाच नोटीशीला उत्तर देताना ‘अ‍ॅप्लिकेशन ऑफ माईंड’ वापरले नसल्याचा आरोप करून समितीची अक्कल काढली आहे. या महाविद्यालयाचे ३८ प्रवेश समितीने रद्द केले आहेत.