पंतप्रधान नरेंद्र मोदी शिक्षकदिनी स्वत: भाषण करणार याचे स्वागत आणि या कल्पनेला विरोध करणाऱ्यांचा निर्धार या दोहोंच्या लढाईत उत्सुकतेचे पारडे आपोआपच जड झाले आणि दिवसभर ‘मोदीगुरुजींच्या वर्गा’चीच चर्चा रंगली. अगदी थोडक्या मुलांनी या तासाला दांडी मारली. परंतु बहुतेक विद्यार्थी आणि शिक्षकांनीही मन लावून भाषण ऐकले. मोदीगुरुजींनीही तास कंटाळवाणा होणार नाही याची पुरेपूर दक्षता घेतली.
पावणेतीनच्या सुमारास कार्यक्रमास सुरुवात झाली आणि शाळांमध्ये शांतता पसरली. मोदी भाषणाला उभे राहिल्यावर तर विद्यार्थ्यांनी टाळय़ा वाजवत त्यांचे स्वागत केले. मोदी यांची ‘स्टाइल’ आम्हाला आवडते. यामुळे आम्ही पंतप्रधान मोदींचे भाषण ऐकतो, अशी प्रतिक्रिया अनेक विद्यार्थ्यांनी दिली.
मुंबईत सुमारे साडेचार हजार शाळांनी मोदी यांचे भाषण दाखविले. तर अनेक विद्यार्थ्यांनी घरी बसून भाषण ऐकणे पसंत केले. भाषण दाखवायचे म्हणून अनेक शाळा केवळ दुपारच्या सत्रातच भरविण्यात आल्या होत्या.
मोदींनी शिक्षक चांगले असावे या मुद्दय़ावर विशेष भर दिला हे मला खूप आवडले, अशी प्रतिक्रिया विक्रोळीच्या पवार पब्लिक स्कूलमधील सानिका वैद्य या नववीतील विद्यार्थिनीने दिली. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा हे विद्यार्थ्यांशी नियमित संवाद साधातात. तसा हा भारतातील पहिलाच प्रयोग होता. यामुळे खूप छान वाटल्याचेही ती म्हणाली. तर भारत विकसित करण्याच्या दृष्टीने त्यांनी मांडलेले अनेक मुद्दे मला खूप आवडले, असे अलिबाग येथील सेंट मेरी कॉन्व्हेंट शाळेतील जुईली नाईक हिने सांगितले.
मोदींचा पहिलाच प्रयोग विद्यार्थ्यांना खूप आवडला असून मुख्याध्यापक महासंघ मोदी यांच्या या उपक्रमाचे स्वागत करत असल्याचे महासंघाचे प्रवक्ते प्रशांत रेडीज यांनी सांगितले. तर भाषणामुळे शिक्षकांबद्दलचा आदर वाढण्यास मदत होईल, असे मत स्वामी मुक्तानंद शाळेतील शिक्षक अनिल बोरनारे यांनी व्यक्त केले.
मदरशामध्ये बंद टीव्ही सुरू झाला
कफ परेड येथील गुलशन-ए-रझा तलीमुल कुरान आणि अनाथाश्रम या मदरशामध्ये मोदी यांचे भाषण दाखविण्यात आले. तेथील विद्यार्थ्यांनीही मोदी यांची स्टाईल खूप आवडते. त्यामुळे आम्ही त्यांना पाहण्यासाठी आल्याचे सांगितले. हे भाषण मुलांना पाहता यावे यासाठी मदशाचे प्रमुख सैय्यद मोहंमद बुखारी यांनी पुढाकार घेऊन बंद पडलेला टीव्ही सुरू केला.
मोबाइल रेडिओवर भाषण ऐकविले
मालवणी येथील पालिकेच्या शाळेत आयत्यावेळी संगणक बंद पडल्यामुळे शिक्षकांनी मोबाइलवरून भाषण ऐकवण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी मोबाइलवर रेडिओ सुरू केला आणि मोबाइलपाशी ध्वनिक्षेपक लावला़