खासगी शाळांमधील शिक्षकांना केवळ सुट्टीच्या दिवशीच निवडणुकीशी संबंधित कामे देण्यात यावी, या उच्च न्यायालयाच्याआदेशाचे राज्य सरकारकडमून उल्लंघन होत असल्याने या संदर्भात अवमान याचिका दाखल करण्याचा इशारा आमदार रामनाथ मोते यांनी दिला आहे.
निवडणूक आयोगाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात हमी देण्यात आली होती की कोणत्याही परिस्थितीत शिक्षकांना शालेय कामकाजाच्या दिवशी व कामाच्या वेळेत निवडणुकीची कामे देण्यात येणार नाही. तरीही सरकारी अधिकाऱ्यांकडून या आदेशाची अंमलबजावणी होत नाही, असा आरोप मोते यांनी केला आहे. नजीकच्या काळात विधानसभा निवडणुका येणार आहेत.
त्याची तयारी म्हणून पुन्हा शिक्षकांना निवडणुकांची कामे देण्यात येतील. ही कामे देताना न्यायालयाच्या आदेशाचे पालन व्हावे, असे मोते यांनी निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे. अन्यथा न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.