ब्रिटनचे मंत्री साजिद जावेद यांची ग्वाही
भारतीय विद्यार्थानी शिक्षणासाठी ब्रिटनमध्ये यावे, यासाठी व्हिसा कायद्यामध्ये सुसूत्रता, सुटसुटीपणा आणि त्यात लवचिकता आणली जाईल, अशी ग्वाही इंग्लंडचे व्यापार मंत्री साजिद जावेद यांनी शुक्रवारी येथे दिली.
इंग्लंडच्या भारतातील उप-उच्चायुक्त कार्यालयाच्या पुढाकाराने ‘टाटा मुलभूत संशोधन संस्थे’च्या (टीआयएफआर) सभागृहात काही निवडक पत्रकारांशी जावेद यांनी संवाद साधला. त्यावेळी इंग्लंडचे शिष्टमंडळही उपस्थित होते. इंग्लंडमध्ये शैक्षणिक गुणवत्ता आणि अध्यापनाचा अनुभव जास्त असल्याने भारतात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी तेथे येऊन शिकावे, असे आवाहन जावेद यांनी केले. ‘तिथल्या शिक्षणामुळे भारतीय विद्यार्थ्यांची रोजगारक्षमता निश्चितपणे वाढेल. तसेच, चांगल्या क्षेत्रात उत्तम वेतनावर काम करण्याची शक्यताही वाढेल,’ असे त्यांनी इंग्लंडमधील शिक्षणाचे फायदे स्पष्ट करताना सांगितले. इंग्लंडमध्ये पदवीधर नसलेल्या सर्वसाधारण विद्यार्थाला भारतातील पदवीधर विद्यार्थ्यांपेक्षा तीन ते चार पटीने वेतन मिळते. त्यामुळे तेथील शिक्षणाचा आणि पर्यायाने उपलब्ध होणाऱ्या सुविधांचा लाभ भारतीय विद्यार्थानी घ्यावा, अशा शब्दांत त्यांनी परदेशात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.
शिक्षणासाठी इंग्लंडमध्ये आलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना परदेशात आल्यासारखे वाटत नाही, इतके तिथले वातावरण अनुकूल आहे. गेल्या काही वर्षांपासून आम्ही भारतीय विद्यार्थासोबत दिवाळीही साजरी करत आहोत, असे सांगून त्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच ब्रिटनचा दौरा केला. या पाश्श्र्वभूमीवर शिक्षण क्षेत्रात ब्रिटनच्या मंत्र्यांची भारत भेट महत्त्वाची मानली जात आहे.

इंग्लंडमधील अग्रगण्य शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठे भारतात संयुक्तपणे काम करण्यास उत्सुक आहेत. हाच हेतू घेऊन आपण शिष्टमंडळासह भारतात आलो आहोत. दोन्ही देशांच्या शिक्षणासंबंधी संयुक्त प्रकल्पासाठी काही ठोस पाऊले उचण्यात येतील. याशिवाय भारत सरकारच्या ‘कौशल्य भारत’ प्रकल्पातही आम्ही सहभागी होणार आहोत.
– साजिद जावेद,
इंग्लंडचे व्यापार मंत्री