‘महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळा’च्या दहावीच्या भूगोल पुस्तकात चुका तर आहेतच; पण, या पुस्तकातील ‘प्रादेशिक’ दृष्टिकोनाबद्दल तज्ज्ञांचे गंभीर आक्षेप आहेत. ‘पाचवीला भारत अभ्यासल्यानंतर तो थेट दहावीत अभ्यासायचा आहे. पण, हा भारत ‘एकात्मिकपणे’ समोर येण्याऐवजी प्रादेशिक दृष्टिकोनातून तुकडय़ातुकडय़ाने मांडण्यात आल्याने हवामान, पीक, खनिजे, नद्या, रस्ते-दळणवळण आदी बाबतीत भारताचे संपूर्ण चित्रच विद्यार्थ्यांच्या डोळ्यांसमोर उभे राहत नाही,’ अशी प्रतिक्रिया राज्य शिक्षण मंडळाचे माजी सदस्य आणि भूगोलाचे माजी प्राध्यापक (साठय़े महाविद्यालय) प्रा. विद्याधर अमृते यांनी व्यक्त केली. हा दृष्टिकोन इतका खटकणारा आहे की या पुस्तकाबाबत केवळ आक्षेप उपस्थित करून अमृते थांबले नसून त्यांनी हे संपूर्ण पुस्तकच मागे घेण्याची मागणी केली आहे.

‘भारताचा संपूर्ण एकात्मिक अभ्यास म्हणजे देश हे एकच एकक घेऊन भूगोल शिकविण्याऐवजी त्याचे ‘तुकडे-तुकडे’ करून त्या त्या प्रदेशाचा भूगोल वर्णिला गेला आहे. या उलट इतर मंडळांच्या पाठय़पुस्तकांतून तो एकत्रितपणे शिकविला जातो. त्यामुळे, महाराष्ट्रातील मुलांचे या दृष्टीकोनामुळे फार मोठे नुकसान होईल,’ अशी भीती अमृते यांनी व्यक्त केली.

पुण्याच्या एसएनडीटीतील भूगोलाचे माजी शिक्षक व मंडळाचे माजी सदस्य लक्ष्मण मालुसरे यांनीही याबाबत नापसंती व्यक्त केली. ‘प्रादेशिक दृष्टिकोन आधुनिक समजला जात असला तरी तो एमए स्तरावर शिकविला जातो. त्यातून दहावीच्या विद्यार्थ्यांकरिता हा दृष्टिकोन मांडताना भाषा सोपी असायला हवी होती. पण भरताड माहिती, चुकलेली मांडणी यामुळे भारत समजून घेताना मुलांना खूप त्रास होणार आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.