08 March 2021

News Flash

तोंडसुरे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला आयएसओ मानांकन

गुणवत्तापूर्ण कामकाज आणि आदर्शवत सेवा पुरवणाऱ्या कंपन्या, कार्यालयांना आयएसओ मानांकन दिल्याचे तुम्ही आजवर ऐकले असेल.

| January 22, 2015 01:29 am

गुणवत्तापूर्ण कामकाज आणि आदर्शवत सेवा पुरवणाऱ्या कंपन्या, कार्यालयांना आयएसओ मानांकन दिल्याचे तुम्ही आजवर ऐकले असेल. मात्र एखाद्या शाळेला आणि तेही जिल्हा परिषदेच्या एखाद्या शाळेला आयएसओ मानांकन मिळाले असे म्हटले तर कोणाचा विश्वास बसणार नाही, पण रायगड जिल्ह्य़ातील म्हसळा तालुक्यातील तोंडसुरे गावातील जिल्हा परिषद शाळेने ही किमया करून दाखवली आहे. गुणवत्तापूर्ण कामकाज आणि आदर्शसेवेसाठी या प्राथमिक शाळेला आयएसओ मानांकन प्राप्त झाले आहे.   जिल्हा परिषदेची शाळा म्हटली की मोडकळीस आलेली जीर्ण इमारत, सोयीसुविधांचा अभाव, रंग गेलेल्या आणि ओल्या िभती, कुबट वास, स्वच्छतागृहांची कमतरता, विद्यार्थ्यांची घटणारी संख्या, शिक्षणाचा ढासळता आलेख हे चित्र उभे राहते. यामुळे इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळांत मुले पाठवण्याकडे पालकांचा कल वाढतो आहे. मात्र अशा प्रतिकूल परिस्थितीत एखादी जिल्हा परिषद शाळा आदर्शवत काम करत असेल तर कोणाला खरे वाटणार नाही.
मात्र शासनाच्या लालफीतशाही कारभाराला दूर सारत शाळेच्या सर्वागीण उत्कर्षांसाठी प्रयत्न करण्याचा निर्णय तोंडसुरे गावातील शिक्षक आणि ग्रामस्थांनी घेतला आणि बघता बघता शाळेचा कायापालट झाला. कोकणातील आदर्श शाळा म्हणून या शाळेकडे पाहिले जाऊ लागले आहे. स्वच्छ, सुंदर आणि संस्कारांचे बाळकडू पाजणारी आणि संपूर्ण ग्रामस्थांनी जणू दत्तक घेतलेली तोंडसुरे शाळा पाहायला आता अनेक जण गर्दी करू लागले आहेत.
शाळेचं महत्त्व सांगणारी बोधवाक्ये, त्यांच्या सोबतीला साकारलेली सुयोग्य चित्रे, बागबगीचा, भाजीपाला लागवड, ध्यानधारणा कक्ष,  छोटं पण नेटकं मदान, गांडूळ खताचा प्रकल्प, रूम टू रीडमध्ये असलेला पुस्तकांचा खजिना, संगणक कक्ष, पालकांसाठी व शिक्षकांसाठी असलेल्या वेगवेगळ्या तक्रारपेटय़ा, सुंदर व देखणे कारंजे, मुलांसाठी पाळणे, झोपाळे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छतागृहे ही वैशिष्टय़े आहेत या आदर्श शाळेची. या वैशिष्टय़ांमुळे तोंडसुरे शाळेला आयएसओ ९००१-२००८ हे मानांकन प्राप्त झाले आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही शाळा सातही दिवस सुरू असते. साधारणपणे जिल्हा परिषदेच्या शाळा १० ते ५ या वेळेत भरवल्या जातात, पण या शाळेतील मुले संध्याकाळी ७ पर्यंत शाळेत असतात. यावेळेत गणित आणि इंग्रजी या विषयांचे विशेष मार्गदर्शन केले जाते. सात वर्षांपूर्वी शाळेची परिस्थिती फारशी चांगली नव्हती. शाळेत भौतिक सुविधा आणि क्रीडांगणांचा अभाव होता.
ही परिस्थिती बदलण्याचा विचार शाळेतील शिक्षक नरेश सावंत यांच्या मनात आला. आणि त्याला गावकऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. शासकीय मदतीची वाट न पाहता श्रमदान आणि मुंबई मंडळांच्या आíथक मदतीतून शाळेचे चित्र पालटण्यात आले. याचा परिणाम मुलांच्या गुणवत्तेवरही दिसून आला. शिक्षण, कला, क्रीडा आणि सांस्कृतिक विभागात शाळेतील मुलांना अनेक बक्षिसे मिळाली असल्याचे सावंत यांनी सांगितले.    तर गावातील लोकांचा ओढा शाळेकडे वाढतो आणि तेव्हाच शाळांची प्रगती होते, म्हणून प्रत्येक शिक्षकांनी शाळेच्या गुणवत्तेकडे लक्ष दिले पाहिजे, असे येथे म्हटले जात आहे.
 म्हसळा पंचायत समितीच्या गट शिक्षणाधिकारी विजया टाळकुटे यांनी यावर प्रतिक्रिया देताना शाळेच्या उत्कर्षांत शिक्षकांबरोबरच या गावातील लोकांच्या योगदानाला विशेष महत्त्व असल्याचे सांगितले. रायगड जिल्ह्य़ातील इतर जिल्हा परिषद शाळांनीही तोंडसुरे शाळेचा आदर्श ठेवला, तर इंग्रजी माध्यम आणि खासगी शाळांमुळे निर्माण झालेले आव्हान थोपवता येऊ शकेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 22, 2015 1:29 am

Web Title: zp school gets iso branding
टॅग : Zp School
Next Stories
1 विद्यापीठात आता सूर्यनमस्कार!
2 पीडीएमएमसी, टिळक विद्यापीठाची चौकशी
3 एक हजार विद्यार्थ्यांना आयएएससाठी मोफत प्रशिक्षण
Just Now!
X