भारतीय व्यवस्थापन संस्था (आयआयएम) आणि अन्य व्यवस्थापन शिक्षण संस्थांमधील प्रवेशांसाठी घेण्यात आलेल्या सामायिक प्रवेश परीक्षेचा(कॅट)निकाल शनिवारी सायंकाळी जाहीर करण्यात आला. यंदा १६ विद्यार्थ्यांना १०० पर्सेटाइल मिळाले आहेत. यंदाच्या परीक्षा स्वरुपात करण्यात आलेल्या बदलांचा हा परीणाम असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
१६ व २२ नोव्हेंबर रोजी घेण्यात आलेल्या कॅट परीक्षेला यंदा देशाभरातून एक लाख ६८ हजार विद्यार्थी बसले होते. शनिवारी संध्याकाळी सात वाजता निकाल जाहीर झाला पण संकेतस्थळ क्रॅश झाल्यामुळे विद्यर्थ्यांना रात्री उशीरापर्यंत निकाल पाहता आला नव्हता.
यावर्षी परीक्षेच्या स्वरुपात बदल करण्यात आले होते याचा फायदा विद्यार्थ्यांना झाल्याचे परीक्षा नियंत्रक डॉ. रोहीत कपूर यांनी स्पष्ट केले. या वर्षी १६ विद्यार्थ्यांना १०० पर्सेटाइल मिळाले असून गेल्यावर्षी हे प्रमाण आठ इतके होते. तर १० जणांना ९९.९९ पर्सेटाइल मिळाले होते. या वर्षी परीक्षेचा कालावधी १४० मिनिटांवरून १७० मिनिटे करण्यात आला होता.
यामुळे विद्यार्थ्यांना अधिकचा वेळ मिळाल्याचेही डॉ. कपूर यांनी स्पष्ट केले. पण गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या परीक्षेची काठीण्य पातळी अधिक होत असे विद्यार्थ्यांचे मत आहे. या परीक्षेत १०० पर्सेटाइल मिळवणाऱ्यांमध्ये दिल्लीची नेहा मांगलिक या एकमेव मुलीचा समावेश आहे.
तर बेंगळुरू येथील अनेक विद्यार्थ्यांचा समावेश आहे. व्हीजेटीआयमधून अभियांत्रिकीची पदवी मिळावलेल्या तसेच सध्या बेंगळुरू येथे टेक्सास इंस्ट्रूमेंट या कंपनीत काम करणाऱ्या स्वप्निल नगारे याला ९९.९१ पर्सेटाइल इतके गुण मिळाले आहेत.