५० हजार विद्यार्थी अर्ज करण्याची शक्यता; ४४ हजार विद्यार्थ्यांचा प्रवेशबदल

अकरावीच्या पहिल्या विशेष फेरीमध्ये ४४ हजार ४३३ विद्यार्थ्यांनी प्रवेशबदल केल्यानंतर मंगळवारी दुसऱ्या विशेष फेरीला सुरुवात होत आहे. या वेळी सुमारे ५० हजारांहून अधिक विद्यार्थी प्रवेशबदल करण्यासाठी अर्ज करण्याची शक्यता आहे.

याआधी पहिल्या विशेष फेरीसाठी एकूण ६७ हजार ६२७ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यातील ५९ हजार ९६० विद्यार्थ्यांना निश्चित प्रवेश देण्यात आला, तर ७ हजार ६६७ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला नव्हता. मात्र प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांपैकी केवळ ४४ हजार ४३३ विद्यार्थ्यांनी प्रवेशबदल केला, तर १५ हजार २३२ विद्यार्थ्यांनी प्रशासनाने दिलेला पर्याय नाकारला आहे. त्यामुळे संबंधित विद्यार्थी पुन्हा प्रवेश अर्ज करण्याची शक्यता आहे.

दरम्यान, पहिल्या फेरीत पात्र अर्ज करणाऱ्या एकूण विद्यार्थ्यांपैकी सुमारे ३२ विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आले, तर २६३ विद्यार्थ्यांनी प्रवेश रद्द केलेले आहेत.

त्यामुळे पहिल्या फेरीअखेर प्रवेश अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांमधील सुमारे २३ हजारांहून अधिक विद्यार्थी असंतुष्ट आहेत. याशिवाय पहिल्या विशेष फेरीत ३१ हजार ३४ विद्यार्थ्यांना पूर्ण अर्ज भरता आला नव्हता. त्यामुळे दुसऱ्या विशेष फेरीत सुमारे ५० हजारांहून अधिक अर्ज येण्याची शक्यता आहे.

मंगळवारी, १६ ऑगस्टला दुसरी विशेष फेरी सुरू होत असून पुन्हा लॉगइन आयडी आणि पासवर्ड देण्यास सुरुवात होईल. पहिल्या फेरीत अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना या वेळी नव्याने लॉगइन आयडी व पासवर्ड घ्यावा लागेल, तर अपूर्ण अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांना नव्याने लॉगइन आयडी आणि पासवर्ड घेण्याची गरज नाही.

पहिल्या फेरीतील विद्यार्थ्यांचा नव्याने अर्ज आवश्यक

आधी अपूर्ण राहिलेला प्रवेश अर्ज नव्याने भरून पसंतिक्रम अर्ज भरण्याची गरज आहे. मात्र पहिल्या विशेष फेरीत संपूर्ण अर्ज भरून सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना नव्याने लॉगइन आयडी व पासवर्ड घेऊन नव्याने अर्ज भरावा लागणार आहे.