‘राष्ट्रीय शैक्षणिक योजना आणि प्रशासन विश्वविद्यालया’कडून शैक्षणिक प्रशासनातील कल्पकतेबद्दल दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय पुरस्कारासाठी यंदा महाराष्ट्रातील आठ शिक्षण अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे.
जिल्हा व गट स्तरावरील शिक्षण विभागाच्या प्रशासनात कल्पकता व नावीन्याचा अंतर्भाव करून प्रशासनात कार्यक्षमता आणणाऱ्या शिक्षण अधिकाऱ्यांना हा राष्ट्रीय पुरस्कार दिला जातो. देशभरातून निवड करण्यात आलेल्या शिक्षण अधिकाऱ्यांमध्ये यंदा महाराष्ट्रातील आठ शिक्षण अधिकारी या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. यात यवतमाळ येथील जिल्हा शिक्षण अधिकारी डॉ. सुचिता पाटेकर, नाशिक येथील उपशिक्षण अधिकारी किरण कुवर, पुणे येथील ब्लॉक शिक्षण अधिकारी ज्योती परिहार, कोल्हापूरच्या शिक्षण अधिकारी स्मिता गौड व ब्लॉक शिक्षण अधिकारी डॉ. गणपती कमलकर, उस्मानाबाद येथील ब्लॉक शिक्षण अधिकारी तृप्ती अंधारे व कादर शेख तसेच सांगली येथील ब्लॉक शिक्षण अधिकारी नामदेव माळी यांचा समावेश आहे. नवी दिल्ली येथे ९ व १० डिसेंबर दरम्यान ‘शैक्षणिक प्रशासनातील कल्पकता’ या विषयावर आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेत केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती ईराणी यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.