तयारीचे ‘अबक’ तंत्र

शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी आता अवघ्या पंधरा दिवसांवर येऊन ठेपली आहे. आता सर्व विषयांचा अभ्यास आटोक्यात आला असेल. अ

शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी आता अवघ्या पंधरा दिवसांवर येऊन ठेपली आहे. आता सर्व विषयांचा अभ्यास आटोक्यात आला असेल. अभ्यासाच्या शेवटच्याच काही दिवसांमध्ये प्रश्न सोडवण्याच्या माध्यमातून केलेला अभ्यास अधिक फायदेशीर ठरू शकतो. एखादा विषय घ्यायचा, तो विषय संपला की त्या विषयावरचे  शंभर ते दोनशे बहुपर्यायी प्रश्न सोडवायचे आणि मग पुढच्या विषयाकडे जायचे. अशा तऱ्हेने सर्व अभ्यासक्रम प्रश्न सोडविण्याच्या मार्गाने पूर्ण करायचा. त्यासाठी कोणत्या दिवशी कोणत्या विषयाचे प्रश्न सोडवायचे याचे अचूक नियोजन हवे. ज्या विषयाचे प्रश्न सोडवायचे असतील, त्या विषयाच्या नोट्स, पुस्तके, अधोरेखित केलेले भाग पहायचा; मग पुस्तक बंद करायचे आणि मग बहुपर्यायी प्रश्न सोडवायला घ्यायचे. आता हे प्रश्न सोडविण्याचे एक तंत्र आहे. मी या तंत्राला नाव दिले आहे- ‘अबक तंत्र’.
अबक तंत्र म्हणजे नेमके काय ?
जो अभ्यास आपण करतो त्याचे अ, ब आणि क अशा गटांमध्ये नीट वर्गीकरण करायचे. आता हे वर्गीकरण कसे करायचे ते पाहुया. घरी अभ्यास करताना एखाद्या विषयावरचे बहुपर्यायी प्रश्न सोडवायला बसताना प्रश्नाखालचे पर्याय एखाद्या कार्डाने झाकून टाकायचे. प्रश्न वाचायचा पण कार्डाखालचे चार पर्याय वाचायचे नाहीत. पर्याय न पाहता उत्तर देता आले तर त्याचा अर्थ असा आहे की तुमचा तो भाग ‘अ’ विभागामध्ये जातो. ‘अ’ विभाग याचा अर्थ बहुपर्यायी प्रश्न वाचून त्याखाली दिलेले पर्याय न वाचता उत्तर देता येणे. याला मी अंतिम लक्ष्य म्हणतो. बरोबर उत्तर देता आले तर ‘अ’ पण उत्तर नाही आले तर सोडून द्या. एकूण २०० प्रश्नांपैकी १४० हून अधिक उत्तरे बरोबर आली म्हणजे तुम्ही योग्य मार्गावर आहात. जर १४० हून कमी उत्तरे आली, तर अजून थोडय़ा तयारीची आवश्यकता आहे. मात्र, १०० हून कमी उत्तरे बरोबर आली तर ती धोक्याची घंटा आहे.
‘ब’ विभाग म्हणजे प्रश्न पाहिल्या पाहिल्या उत्तर आठवत नाही. मात्र, त्याचे चार पर्याय पाहिल्यानंतर उत्तर लक्षात येते. थोडा विचार केल्यावर उत्तर सुचते. प्रश्नाच्या खाली दिलेले ४ पर्याय पाहिल्यावर आणि बुद्धीला थोडा ताण दिल्यावर उत्तर लक्षात आले की ते प्रश्न ‘ब’ विभागामध्ये टाकायचे. ज्या विषयांचे प्रश्न ‘ब’ विभागात त्या विषयांचा अभ्यास अजून जास्त व्हायला हवा. ‘क’ विभाग म्हणजे अंधार. दिलेले चार पर्याय पाहिले, बुद्धी ताणली तरी काहीही उत्तर सुचत नाही. तो ‘क’ विभाग. ‘क’ विभागातील विषयांची तयारी व्हायला हवी.प्रश्न सोडवताना त्याचे अबक वर्गीकरण केले की तयारीचा तुम्हाला अंदाज येईल. ‘ब’ आणि ‘क’ विभागाचे प्रश्न जेवढे जास्त तेवढी त्या विषयाची तयारी अधिक करायला हवी. अभ्यास जास्त करायला हवा. यावर उपाय म्हणून पुन्हा पुन्हा सराव प्रश्न सोडवायचे. सगळ्यात सांभाळण्याची जागा असते ती म्हणजे ‘अ’ विभाग. आपण अगदी आत्मविश्वासाने उत्तर दिले आणि ते चुकीचे निघाले तर त्याच्याइतके घातक दुसरे काही नाही. पर्याय न पाहता मला उत्तर येते आहे अशा आविर्भावात उत्तर ठोकून देणे आणि मग ते चुकीचे निघणे हे जास्त धोकादायक आहे, हे लक्षात घ्यायला हवे. हा सराव करताना आपण  तीन ते चार हजार प्रश्न सोडवतो. हे सर्व करण्यामागे खरा हेतू असा की बहुपर्यायी प्रश्न सोडवण्याची सवय व्हावी. प्रश्न पाहणे, पर्याय पाहणे आणि त्यातून नेमके उत्तर सुचणे ही मेंदूची प्रतिक्षिप्त क्रिया असली पाहिजे.

परीक्षेमध्येही ‘अबक’ तंत्र
* प्रत्यक्ष परीक्षेमध्येही प्रश्न सोडवताना हे ‘अबक’ तंत्र उपयोगी ठरते. प्रश्नपत्रिका सोडवताना समोर एक कच्चा कागद ठेवायचा.
* प्रश्न पाहून पटकन उत्तर लक्षात येणारा प्रश्न सोडवायचा अन्यथा कच्चा कागदावर प्रश्न क्रमांक नोंदवून ठेवायचा आणि पुढच्या प्रश्नांकडे जायचे.
* प्रश्न पाहिल्याबरोबर पटकन उत्तरे येणारे प्रश्न ‘अ’ विभागातले. ‘अ’ विभाग झाला की मग थोडा विचार करून आठवणारी उत्तरे ‘ब’ विभागात आणि काहीच लक्षात येत नाही असे प्रश्न ‘क’ विभागामध्ये.
*  अशा प्रकारे प्रश्नपत्रिका सोडवायची. ‘क’ विभागातील प्रश्न सोडवताना वेगवेगळे पर्याय निवडण्याऐवजी एकच अंक ठरवायचा आणि सर्व प्रश्नांना तो पर्याय निवडायचा.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व के.जी. टू कॉलेज बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Abc system for preparing tet test