बारावीच्या सुधारित अभ्यासक्रमानुसार अंतर्गत मूल्यमापनाचे २० टक्के गुण संबंधित शाळांच्या हाती दिल्याचा परिणाम म्हणून यंदा बारावीच्या परीक्षेत राज्यात तब्बल ९०.०३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इतिहासातील हा निकाल उच्चांकी ठरला. मात्र गतवर्षीच्या तुलनेत यंदा उत्र्तीर्णतेचा टक्का वाढल्याने प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रम प्रवेशासाठीची चुरस तीव्र होणार आहे. ही स्पर्धा वाणिज्य शाखेमध्ये सर्वाधिक असेल. तर कला आणि विज्ञान शाखेसाठी काही ठराविक महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना मोठी झुंज द्यावी लागेल.
यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. यंदा राज्यभरातून ११ लाख ९८ हजार ८५९ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली. त्यातील १० लाख ७९ हजार ३३२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यात ५ लाख १००० विद्यार्थिनी असून, परीक्षेला बसलेल्या मुलींपैकी ९३.५० टक्के मुली उत्तीर्ण झाल्या, तर उत्तीर्ण झालेल्या मुलांची संख्या ८७.२३ टक्के आहे. राज्य मंडळाच्या नऊ विभागांमध्ये यंदा कोकण विभागाने आघाडी घेतली असून, या विभागाचा निकाल ९४.८५ टक्के लागला आहे. सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा (८८.३० टक्के) लागला. निकालाचा टक्का वाढल्याने महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठीचा पेच निर्माण होणार आहे. काही महाविद्यालयांमध्ये तर कनिष्ठ महाविद्यालयांच्या तुलनेत पदवीच्या जागा कमी असल्याने त्त्याच महाविद्यालतील बारावीच्या विद्यार्थ्यांना सामावून घेतानाच नाकीनऊ येणार आहे. दरवर्षी बारावीला काही विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्याने महाविद्यालयांना पदवीकरिता बाहेरच्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी जागा उपलब्ध करून देता येतात. परंतु, यंदा बारावी निकालाचा टक्का सर्वच शाखांमध्ये चांगलाच वधारल्याने पदवीच्या प्रवेशांसाठीची चुरस अटीतटीची असेल. काही महाविद्यालयांना तर यंदा बाहेरच्या विद्यार्थ्यांकरिता जागा उपलब्ध करून देणेही शक्य होणार नाही.     

गुणपत्रिका १० जूनला मिळणार
’विद्यार्थ्यांना बारावीच्या गुणपत्रिकेचे वाटप १० जून रोजी दुपारी तीन वाजता संबंधित शाळांमधून केले जाणार आहे. संकेतस्थळावरून विद्यार्थ्यांना निकालाची प्रिंट काढता येते.
’संकेतस्थळावरील या गुणपत्रकाच्या आधारे डीएड किंवा इतर प्रवेश प्रक्रियेची कार्यवाही सुरू करता येईल. मात्र, अधिकृत गुणपत्रिकेच्या आधारेच नंतर प्रवेश अंतिम केले जातील.