scorecardresearch

आता प्रवेशासाठी ‘परीक्षा’!

राज्याचा दहावीच्या परीक्षेचा (माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा) निकाल शुक्रवारी जाहीर झाला असून विशेष श्रेणी मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या या वर्षी तब्बल ४१ हजार २४६ ने वाढल्यामुळे अकरावीमध्ये चांगल्या महाविद्यालयामध्ये प्रवेशासाठीची या वर्षी स्पर्धा वाढणार आहे.

राज्याचा दहावीच्या परीक्षेचा (माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा) निकाल शुक्रवारी जाहीर झाला असून विशेष श्रेणी मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या या वर्षी तब्बल ४१ हजार २४६ ने वाढल्यामुळे अकरावीमध्ये चांगल्या महाविद्यालयामध्ये प्रवेशासाठीची या वर्षी स्पर्धा वाढणार आहे. दहावीचा राज्याचा निकाल ८३.४८ टक्के लागला असून, गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये दोन टक्क्य़ांनी वाढ झाली आहे.
या वर्षी विशेष श्रेणी आणि प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढल्यामुळे चांगल्या महाविद्यालयांमधील प्रवेशासाठी स्पर्धा वाढणार आहे. या वर्षी २ लाख ६७ हजार ५८ विद्यार्थी विशेष श्रेणीमध्ये म्हणजे ७५ टक्क्य़ांपेक्षा अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत. म्हणजेच उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांपैकी साधारण २१ टक्के विद्यार्थी हे विशेष श्रेणीमध्ये आहेत. गेल्या वर्षी एकूण उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी १८ टक्के विद्यार्थी हे विशेष श्रेणीमध्ये उत्तीर्ण झालेले होते. प्रथम श्रेणीमध्ये म्हणजे ६० टक्क्य़ांपेक्षा अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाणही या वर्षी वाढले आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी साधारण ४० टक्के विद्यार्थ्यांना प्रथम श्रेणी मिळाली आहे. गेल्या वर्षी हे प्रमाण ३८ टक्के होते. राज्यात दहावीच्या परीक्षेसाठी १४ लाख ९९ हजार २७६ विद्यार्थी बसले होते, त्यापैकी १२ लाख ५१ हजार ५२८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्याच्या एकूण निकालात दोन टक्क्य़ांनी वाढ झाली असून गेल्या वर्षी ८१.३२ टक्के  निकाल लागला होता.
दरवर्षी प्रमाणे या वर्षीही मुलींनी बाजी मारली असून ८४.९० टक्के  मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. मुलांचे उत्तीर्णतेचे प्रमाण ८२.२४ टक्के  आहे. कोकण विभागाचा ९३.७९ टक्के निकाल लागला असून हा विभागात राज्यात आघाडीवर आहे. या वर्षी पुनर्परीक्षार्थी विद्यार्थी २ लाख ३२ हजार ६१९ होते. त्यांचे उत्तीर्णतेचे प्रमाण २९.५१ टक्के आहे. राज्यभरातून ६ हजार ३१९ अपंग विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ८०.६६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. रात्रशाळेतील ४ हजार ५४ विद्यार्थ्यांपैकी ६० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या वर्षी राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील खेळाडूंना उत्तीर्ण होण्यापुरतीच २५ गुणांची सवलत देण्यात आली आहे.
* १५ जून – गुणपत्रक मिळणार
* ७ ते २७ जून – उत्तरपत्रिकेच्या छायाप्रतीसाठी अर्ज करण्याची मुदत
* १५ ते २५ जून – गुणपडताळणीसाठी अर्ज करण्यासाठी मुदत

मराठीतील सर्व के.जी. टू कॉलेज ( Kgtocollege ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या