देशातील कृषी अभ्यासक्रम अद्ययावत करण्यात येत असून कृषी आणि उद्योगजगत जोडले जावे असा प्रयत्न या नव्या अभ्यासक्रमात करण्यात आला आहे. २०१६ पासून तो देशभरातील सर्व कृषी विद्यापीठांमध्ये लागू होण्याची शक्यता आहे, अशी माहिती महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. तुकाराम मोरे यांनी शनिवारी माध्यमांशी बोलताना दिली.
देशातील कृषी अभ्यासक्रमात ८० टक्के देशपातळीवरील आणि २० टक्के स्थानिक पातळीवरील घटकांचा समावेश करण्यात येणार आहे. बाजारपेठ, उद्योगक्षेत्र, हवामान बदल अशा घटकांचा नव्या अभ्यासक्रमांत समावेश होणार आहे. सध्याचा अभ्यासक्रम हा पाच वर्षांपूर्वीचा आहे. गेल्या पाच वर्षांत कृषी क्षेत्रात तसेच बाजारपेठेत बरीच स्थित्यंतरे झाली आहेत. त्यांचे प्रतिबिंब या नव्या अभ्यासक्रमात असेल.