शिक्षक भरतीसाठी आवश्यक असलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेतून कला, कार्यानुभव, संगीत, शारीरिक शिक्षण शिक्षकांना वगळले आहे. याचबरोबर वरिष्ठ प्राथमिकची परीक्षा देणाऱ्यांना कनिष्ठ प्राथमिकच्या परीक्षेतून सवलत देण्यात येणार असल्याचा निर्णय शासनाने जाहीर केला आहे. यामुळे हजारो शिक्षकांना दिलासा मिळाला आहे.
शिक्षक पात्रता परीक्षेच्या २३ ऑगस्ट २०१३च्या निर्णयानुसार  पहिली ते पाचवी व सहावी ते आठवी या दोन गटात अर्ज करणाऱ्या शिक्षकांना दोन्ही प्रश्नपत्रिका स्वतंत्र सोडवाव्या लागणार होत्या, मात्र या निर्णयात सुधारणा करून त्याऐवजी दोन्ही गटाला स्वतंत्र प्रश्नपत्रिका राहतील; तसेच वरीष्ठ प्राथमिकची परीक्षा देणाऱ्या शिक्षकाला कनिष्ठ प्राथमिकसाठी स्वतंत्र परीक्षा द्यायची गरज भासणार नाही. यामुळे वरीष्ठ प्राथमिकची परीक्षा दिल्यावर शिक्षकांना कनिष्ठ प्राथमिकच्या परीक्षेत उत्तीर्ण होणे गरजेचे राहणार नाही. तसेच कला, कार्यानुभव, संगीत, शारीरिक शिक्षण शिक्षकांना या परीक्षेतून वगळवावे अशी मागणी केली जात होती. त्यानुसार हा निर्णय झाला. दरम्यान, महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघ महासंघ शासनाच्या या निर्णयाचे स्वागत करत असल्याचे संघाचे प्रवक्ते प्रशांत रेडीज यांनी स्पष्ट केले. या निर्णयामुळे आगामी परीक्षेचा निकाल चांगला लागू शकेल, असे ते म्हणाले.