अकरावीची परीक्षा संपून निकाल जाहीर झाले तरी राज्यातील पुढील म्हणजे २०१६-१७ या शैक्षणिक वर्षांच्या अभियांत्रिकी प्रवेशांचे चित्र स्पष्ट न झाल्याने विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासंबंधीचे चित्र दोन वर्षे आधीच स्पष्ट व्हायला हवे. परंतु, महाराष्ट्रात गेले काही वर्षे सातत्याने या संबंधात संभ्रमाचे वातावरण राहिले आहे. यंदाही अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांबाबत राज्याची ही परंपरा कायम आहे. येत्या म्हणजे २०१६-१७ या शैक्षणिक वर्षांपासून राज्यातील अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी केंद्रीय स्तरावर होणारी ‘जॉईंन्ट एन्ट्रन्स एक्झाम’ऐवजी (जेईई) राज्याची स्वतंत्र ‘सीईटी’ घ्यायचे इतकेच राज्य सरकारतर्फे फेब्रुवारी महिन्यात स्पष्ट करण्यात आले आहे. परंतु, प्रवेशाकरिता केवळ सीईटीचेच गुण गृहीत धरायचे की सध्याच्या पध्दतीनुसार सीईटी (सध्याची जेईई) आणि बारावीचे (५०:५०) एकत्रित गुण ग्राह्य़ ठरणार हे अद्याप स्पष्ट नाही. त्यामुळे, विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
वास्तविक बारावीनंतर वैद्यकीय, अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आदी व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे अभ्यासाचे नियोजन दोन वर्षे आधीपासूनच ठरते. परंतु, अकरावीच्या परीक्षा संपून निकाल जाहीर झाले तरी अभियांत्रिकी प्रवेशांबाबत राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून अधिकृतपणे स्पष्टता करण्यात न आल्याने त्यांच्यामध्ये संभ्रम आहे.
बारावीचे महत्त्व
महाराष्ट्रात अभियांत्रिकी प्रवेशासाठी बारावीच्या गुणांना ५० टक्के इतके वेटेज दिले जाते. परंतु, बारावीचे गुण ग्राह्य़ धरताना विविध शिक्षण मंडळांच्या विद्यार्थ्यांच्या बारावीच्या गुणांचे ‘नॉर्मलायझेशन’चा विषय डोकेदुखी देणारा ठरतो. कारण नॉर्मलायझेशनचा फार्मुला नेहमीच वादग्रस्त ठरतो. याचा अनुभव गेल्या वर्षी अभियांत्रिकीचे प्रवेश करताना तंत्रशिक्षण संचालनालयाने घेतला होता. या कारणामुळे आता एनआयटी या केंद्रीय शिक्षण संस्थेच्या प्रवेशाकरिताही बारावीचे गुण नको, अशी भूमिका घेण्यात आली आहे.
मुळात आयआयटीकरिता बारावीच्या गुणांना ४० टक्के महत्त्व देण्याचा विचार पुढे आला होता. परंतु, विविध शिक्षण मंडळांच्या परीक्षा, मूल्यांकन पध्दतीत असलेल्या तफावतीमुळे हा विचार बारगळला. आज आयआयटीचे प्रवेशही निव्वळ जेईई-अ‍ॅडव्हान्स या प्रवेश परीक्षेवर होतात. पण, राज्यात बारावीच्या परीक्षेला ४० ऐवजी ५० टक्के गुणांचे महत्त्व गेली दोन वर्षे दिले जाते आहे.