‘चार्टर्ड अकाऊंट’साठी (सीए) घेतल्या जाणाऱ्या ‘कॉमन प्रॉफिशिअन्सी टेस्ट’ (सीपीटी) या परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला. आधीच्या परीक्षेच्या तुलनेत या वेळच्या सीपीटीचा निकाल काहीसा घसरला आहे.
‘दि इन्स्टिटय़ूट ऑफ चार्टर्ड अकाऊंट्स ऑफ इंडिया’तर्फे (आयसीएआय) २२ जून, २०१४ रोजी झालेल्या या परीक्षेला देशभरातून १ लाख ३० हजार विद्यार्थी बसले होते. त्यापैकी ३७,३०३ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. हे प्रमाण २८.६३ टक्के इतके आहे. आधीच्या म्हणजे डिसेंबर, २०१३मध्ये झालेल्या परीक्षेमधील उत्तीर्णतेचे प्रमाण ३७.६१ टक्के होते.
या परीक्षेत मुलांच्या तुलनेत मुलींनी चांगली कामगिरी केली आहे. परीक्षा दिलेल्या ५१,८३८ मुलींपैकी १६,११३ (३१.०८टक्के) मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर ७८,४५३ मुलांपैकी केवळ २१,१९० (२७.०१टक्के) जण उत्तीर्ण झाले आहेत. मात्र, या परीक्षेत वरचे तीन क्रमांक पटकावणारे मुलगेच आहेत. गुंटुरचा मुरली मोहन बोरा, भोपाळचा पलाश महेश्वरी आणि नागपूरचा हनी बात्रा यांनी अनुक्रमे पहिला, दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकावला.
‘भारतात सीएंना मोठी मागणी आहे. पूर्वीप्रमाणे केवळ बँकिंग, वित्त सेवा किंवा उत्पादन कंपन्यांमध्येच सीएंना मागणी राहिलेली नाही. तर आयटी, आयटीएस, टेलिकॉम, पायाभूत सेवा आणि रिटेल क्षेत्रातही सीएंना मोठी मागणी आहे. त्यामुळे, सीपीटी, सीए परीक्षांर्थीची संख्या दरवर्षी वाढते आहे,’ असे ‘आयसीएआय’चे अध्यक्ष के. रघू यांनी सांगितले.
जागतिकीकरणामुळे सीएंना मोठय़ा संधी उपलब्ध झाल्या आहेत. दुबई, कुवेत, मस्कत, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर आदी देशांतूनही सीएंना मोठी मागणी आहे. भारतात सीएला सुरवातीच्या टप्प्यातच सुमारे ७.३० लाख रुपयांचे वेतन दिले जाते. सीएची परीक्षा देणाऱ्या मुलींची संख्याही दरवर्षी वाढते आहे.