अभ्यासक्रम बंद करण्याच्या प्रस्तावांना अद्याप मंजुरी नाही

तंत्रशिक्षण विभागाच्या निवांत कारभाराचा फटका राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांना बसला आहे. महाविद्यालयांना तुकडय़ा बंद करण्यासाठी अद्याप मंजुरीच मिळाली नसल्यामुळे महाविद्यालयांच्या लाखो रुपयांच्या मुदत ठेवी अडकून पडल्या आहेत.

राज्यातील अनेक अभियांत्रिकी महाविद्यालयांची परिस्थिती अभ्यासक्रम चालवता येत नाही आणि बंदही होत नाही अशी झाली आहे. विद्यार्थ्यांअभावी अनेक महाविद्यालयांनी तंत्रशिक्षण विभागाकडे या वर्षीपासून तुकडय़ा बंद करण्याचे प्रस्ताव पाठवले होते. काही संस्थांनी अभ्यासक्रम बंद करण्याची मंजुरीही मागितली होती.

राज्यातून साधारणपणे ४० ते ५० संस्थांनी अभ्यासक्रम किंवा तुकडय़ा बंद करण्यासाठी प्रस्ताव पाठवले आहेत. मात्र या तुकडय़ा आणि अभ्यासक्रम बंद करण्यासाठी अद्याप मंजुरीच मिळालेली नाही. अभ्यासक्रम बंद करायचे असल्यामुळे त्यासाठी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे शुल्क तर नाही आणि अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी भरलेल्या मुदत ठेवीही वापरता येत नाहीत अशी परिस्थिती महाविद्यालयांची झाली आहे.

नवा अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी साधारण १५ लाख रुपये मुदत ठेवीपोटी गुंतवावे लागतात.

अभ्यासक्रम बंद करण्यासाठी मंजुरी मिळाल्यानंतर तंत्रशिक्षण विभागाच्या परवानगीने या मुदत ठेवी काढून घेता येतात. मात्र अद्याप अभ्यासक्रम बंद करण्यासाठी मान्यता देणारा शासननिर्णय आलेला नाही. त्यामुळे महाविद्यालयांच्या लाखो रुपयांच्या मुदत ठेवी अडकून पडल्या आहेत.

जून-जुलै महिन्यांत विद्यार्थ्यांचे शुल्क आलेले नसते. विद्यार्थी मिळत नसल्यामुळे अनेक महाविद्यालयांची अवस्था गेल्या दोन-तीन वर्षांपासून वाईट आहे. अशा परिस्थितीत संस्थांचे लाखो रुपये अडकल्यामुळे अडचणींना तोंड द्यावे लागत आहे,’ असे एका महाविद्यालयाच्या प्राचार्यानी सांगितले.