फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया या संस्थेने आपला पवित्रा कडक केला असून, तीस विद्यार्थ्यांना वसतिगृहातील खोल्या सोडण्याचा आदेश दिला आहे. संस्थेचे अध्यक्ष गजेंद्र चौहान यांना पदावरून हटवण्याच्या आंदोलनाचा आज ५८ वा दिवस होता.
एफटीआयआयचे संचालक प्रशांत पाठरावे यांनी सांगितले की, शैक्षणिक चित्रपट प्रकल्पांना तांत्रिक साह्य़ करणाऱ्या ८२ कंत्राटी कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आले आहे, कारण सध्या वर्गच होत नाहीत. दरम्यान, दिल्लीत निदर्शने करणाऱ्या गटाने म्हटले आहे की, आम्ही दिल्ली विद्यापीठ, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, जामिया मिलिया , पाँडिचेरी विद्यापीठ, नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ डिझाइन या संस्थांच्या संपर्कात आहोत.
आमचे आंदोलन केवळ चौहान यांच्याविरोधात नाही, तर इतर चार सदस्यांच्याही विरोधात आहे कारण त्यांचीही पात्रता नाही. एका विद्यार्थ्यांने असा आरोप केला की, अ.भा.वि.पच्या पुण्यातील शाखेचे नेतृत्व करणाऱ्या एकाला सदस्यपद देण्यात आले आहे. ज्या विद्यार्थ्यांना वसतिगृह खाली करण्यास सांगण्यात आले आहे. त्यात ३० विद्यार्थी असून १३ विद्यार्थ्यांना जास्त काळ राहिल्याच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत.