लातूर जिल्ह्य़ातील सातवीत शिकणारी एक मुलगी. वडील शेतकरी आणि आई कपडे शिवून पोट भरते. जिला दोन भावंडे आहेत. घरची परिस्थिती गरीब असल्याने आई-वडिलांना स्वत:चे आणि मुलांचे पोट भरणे कठीण जाते. या मुलीच्या भावाला अपघात झाला आणि त्याच्या उपचारासाठी अचानक खर्च उद्भवला. या चिमुकल्या मुलीने ‘मेलजोल’ संस्थेतर्फे चालणाऱ्या ‘अफलातून बँकेच्या’ उपक्रमातून स्वत:च्या भावाच्या उपचारासाठी पैशांची मदत केली. कधी तरी खाऊसाठी मिळालेल्या पैशांची बचत अशी उपयोगात आणली. लहान वयातच मुलांना आर्थिक शिक्षणाचे धडे देणारी ही ‘अफलातून बँक’ आहे तरी काय?
मुलांच्या सक्षमीकरणाच्या प्रक्रियेत अर्थशिक्षण हा एक महत्त्वाचा भाग आहे, हे जाणवल्याने मुंबईच्या ‘मेलजोल’ संस्थेतर्फे गेली १४ वर्षे मुंबईसह एकूण १० राज्यांमध्ये मुलांसाठी आर्थिक आणि सामाजिक शिक्षणचा कार्यक्रम राबविला जातो आहे. मेलजोलने शालेय स्तरावर बँकेची स्थापना व अर्थशिक्षण या दोन महत्त्वपूर्ण गोष्टी आपल्या कार्यक्रमात समाविष्ट केल्या आहेत. पैसा का वाचवावा, कसा वाचवावा, कुठे खर्च करावा व पैशाचे नियोजन कसे करावे इत्यादी गोष्टींचे शिक्षण मेलजोल त्यांच्या कार्यक्रमातून देण्याचा प्रयत्न करते. पैशाची बचत करून मुलांना त्याचा लाभ भविष्यात घेता येतो हे समजण्यासाठी तसेच बचतीची सवय मुलांच्या अंगी बाणविण्यासाठी मेलजोलने शाळांमध्ये बँकांचा उपक्रम सुरू केला.
मुलांना नुसतेच पैशाच्या बचतीविषयी न सांगता, पैशाप्रमाणेच इतर गोष्टींचीही बचत करता येते, हे या कार्यक्रमाअंतर्गत शिकविले जाते. मेलजोलचा हा उपक्रम फक्त शहरातील महानगरपालिकेच्या शाळांपुरता मर्यादित नसून, थेट जिल्हा परिषद, आश्रम आणि आदिवासी भागांपर्यंत जाऊन पोहोचला आहे.
सध्या ही संस्था जवळजवळ आठ लाख मुले, पाच हजारांहून अधिक शाळा आणि भारतातील ३२ जिल्ह्य़ांमध्ये कार्यरत आहे. आर्थिक शिक्षणाच्या जोडीने सामाजिक शिक्षणही दिले जाते आणि त्याप्रमाणे मुलांमध्ये उद्यमशील नागरिकत्वाची घडवणूक कशी करता येईल याचाही विचार केला जातो. मेलजोलच्या या कार्यक्रमाला मुलांनी ‘अफलातून’ हे नाव दिले आहे. ‘अफलातून’ कार्यक्रमाचे केंद्रस्थान हे ‘अफलातून’ मंडळ आहे. प्रत्येक शाळेत अफलातून मंडळ असते आणि मंडळाच्या संचालक पदांसाठी लोकशाही पद्धतीने निवडणूक होऊन मुलेच मुलांना निवडून देतात. निवडून आलेले मंत्रिमंडळ संचालकपदांसाठी लोकशाही पद्धतीने निवडणूक होऊन मुलेच मुलांना निवडून देतात. निवडून आलेले मंत्रिमंडळ शाळेतील बँकेचे व्यवहार सांभाळतात. जे जे विद्यार्थी बचत करतात त्यांना त्यांचे पासबुक दिले जाते आणि त्यामध्ये पैशाची बचत कशी केली, पैसे कधी काढले इत्यादी गोष्टींची नोंद केली जाते. मुलांना एकत्र आणण्याचे, त्यांना त्यांच्या हक्कांची व जबाबदारीची जाणीव करून देण्याचे व सुजाण नागरित्वाची बिजे त्यांच्यामध्ये रुजविण्याचे, त्यांना कृतिशील बनविण्याचे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रयत्न केल्यास आपण आपली व आपल्या सभोवतालची परिस्थिती बदलू शकतो हा विश्वास निर्माण करण्याचे हे एक माध्यम आहे.
मेलजोलच्या अफलातून कार्यक्रमाची पहिली ते नववीच्या इयत्तेपर्यंत पुस्तक मालिका आहे. ही पुस्तक मालिका ही खास मुलांसाठी तयार केली असून त्यामध्ये ‘आर्थिक आणि सामाजिक शिक्षण’ या बद्दलचे पाठ गोष्टी, गाणी, खेळ या माध्यमांद्वारे मुलांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे. मेलमोल महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि आश्रम व आदिवासी शाळांमधील शिक्षकांना प्रशिक्षण देऊन अफलातून कार्यक्रम राबविण्यासाठी सक्षम करते. याकरिता समानता, लोकशाहीशी बांधीलकी, सामाजिक न्याय, स्वातंत्र्य यावर आधारित शिक्षण व्यवस्था व शाळेतील शिकविण्याची प्रक्रिया असावी असे सुचविले गेले आहे. अफलातून पुस्तक मालिकेतून याच मूल्यांची मुलांना समजेल अशा भाषेत ओळख करू दिली आहे.
मेलजोलच्या आर्थिक शिक्षणाच्या उपक्रमाचे उद्दिष्ट हे ग्रामीण भागातील सावकारशाही, कर्जबाजारीपणा व वेठबिगारीला शह देण्याचे तसेच आर्थिक दुर्बलतेमुळे नाकारल्या जाणाऱ्या मुलांना संधी मिळवायला शिकविणे हे आहे. मेलजोलने २००७ साली एका संस्थेमार्फत अफलातून आर्थिक आणि सामाजिक शिक्षण घेऊन शाळेतून बाहेर पडलेल्या मुलांवर संशोधन केले आणि त्या संशोधनामध्ये असे दिसून आले की, या अभ्यासक्रमातून बाहेर पडलेल्या मुलांपैकी ७० टक्के मुलांनी बचतीची सवय टिकवून धरली होती.
भारतातील गावागावापर्यंत अजूनही बँका पोहोचल्या नाहीत. अगदी छोटय़ा गावांमध्ये किंवा आदिवासी पाडय़ांमध्ये राहणाऱ्या लोकांना बँका माहीत नाहीत. मेलजोलमुळे लहान मुलांना बँकेच्या व्यवहाराची ओळख शालेय स्तरावरील बँकांमुळे होते तसेच या कार्यक्रमांअंतर्गत मुलांना जवळच्या गावातील बँकभेटीचा अनुभवही देण्यात येतो. अपरिचयातून येणारा भिडस्तपण दूर व्हावा या हेतूने बँक आणि पोस्ट भेटींचे आयोजन केले जाते.
मेलजोलचे कार्यकर्ते सांगतात की, मुलांना लागलेली बचतीची सवय ही त्यांचे पालक आता लावून घेत आहेत. ज्या पालकांची बँकेमध्ये खाती नव्हती त्या पालकांनी स्वत:ची खाती उघडली. एकूणच मुलांमध्ये गुणात्मक बदल घडविण्याचे काम मेलजोल संस्था करीत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे जी मुले पैशाची बचत करू शकत नाहीत त्या मुलांना वेळेची, विजेची, पाण्याची तसेच आपल्या वातावरणातील आणि परिसरातील वस्तूंची, गोष्टींची बचत कशी करता येईल हेही शिकविले जाते.
संपर्क – २३०८१०५०, ९९८७३३८९६०



