महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांच्या कार्यक्रमात शिक्षणमंत्र्यांनी केलेल्या घोषणेनुसार मंडळाला आपली कार्यपद्धतीच बदलावी लागली. विद्यार्थी हितासाठी परीक्षेपूर्वी दहा मिनिटे आधी प्रश्नपत्रिका देण्याची केलेली सूचना हा आदेशच मानून त्याच्या अंमलबजावणीसाठी मंडळाने कंबर कसली आहे. शनिवार, आजपासून सुरू होत असलेल्या बारावीच्या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना वीस मिनिटे आधी उत्तरपत्रिका आणि दहा मिनिटे आधी प्रश्नपत्रिका मिळणार आहे.
परीक्षेपूर्वी दहा मिनिटे प्रश्नपत्रिका देण्याचा हा पहिलाच प्रयोग असून त्याची अंमलबजावणी करणे ही मंडळासाठीदेखील परीक्षाच ठरणार आहे. विद्यार्थ्यांचा ताण हलका व्हावा आणि प्रश्नपत्रिकेचे सूक्ष्मपणे अवलोकन करून कोणते प्रश्न आधी सोडवावेत हे आडाखे बांधण्यास वेळ मिळावा यासाठी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विद्यार्थी हित ध्यानात घेऊन तशी घोषणा केली होती. त्याची अंमलबजावणी शनिवारपासून सुरू होत आहे. केवळ बारावीच्याच नाही तर, दहावीच्या विद्यार्थ्यांनाही ही सुविधा उपलब्ध होणार आहे. पुढील वर्षीही बारावी आणि दहावीच्या परीक्षा याच पद्धतीने होणार असून राज्य सरकारने शासकीय अध्यादेश काढून त्यास मूर्त स्वरूप प्राप्त करून दिले आहे.  या बदलाविषयी माहिती देताना मंडळाचे राज्य सचिव कृष्णकुमार पाटील म्हणाले की, ११ वाजता परीक्षेला सुरुवात होणार असेल तर १०.३० वाजता गजर होईल. त्या वेळी विद्यार्थ्यांनी वर्गामध्ये उपस्थित राहावे. १०.४० वाजता विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका देण्यात येणार आहेत. १० मिनिटांत विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकेवर बारकोड, होलोग्राम ही माहिती भरणे अपेक्षित आहे. १०.५० वाजता दुसरा गजर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका देण्यात येणार असून, ११ वाजता तिसरा गजर झाल्यानंतर प्रत्यक्ष परीक्षेस प्रारंभ होईल.

आजपासून परीक्षा

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नऊ विभागीय मंडळांतर्फे घेतल्या जाणाऱ्या बारावीच्या परीक्षेला शनिवारपासून (२१ फेब्रुवारी) सुरुवात होत असून पुनर्रचित अभ्यासक्रमानुसार ही परीक्षा होत आहे. राज्यामध्ये १३ लाख ३९ हजार २०२ विद्यार्थी बारावीची परीक्षा देत असून गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा विद्यार्थी संख्येत सव्वा लाखाची वाढ झाली आहे. गेल्या वर्षी १२ लाख ५४९ विद्यार्थी परीक्षेस बसले होते.