इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची नीट परीक्षेतील कामगिरी खराब असली तरी राज्यांतर्गत एमबीबीएस, बीडीएस आदी वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची स्पर्धा  अटीतटीची राहणार आहे. एमबीबीएस, बीडीएसच्या प्रवेशासाठी सीईटीत किमान ५० टक्के गुण मिळवावे लागतात. नीटसाठी मात्र टॉपर खालोखाल असलेल्या ५०व्या पर्सेटाईलपर्यंतचे विद्यार्थी प्रवेश पात्र ठरविण्यात आले आहेत. त्यानुसार ७२० पैकी ६९१ गुण मिळवून आयुष गोयल हा विद्यार्थी खुल्या गटातून पहिला आला आहे. तर त्याच्या खालोखाल गुण मिळविणारे ५०व्या पर्सेटाईलपर्यंतचे १,५७,२१४ विद्यार्थी प्रवेशपात्र ठरले आहेत. या नुसार खुल्या गटासाठी किमान गुण ९८ आहेत. मागासवर्गीयांसाठी त्या प्रवर्गातील टॉपरच्या ४०व्या पर्सेटाईलपर्यंतचे विद्यार्थी प्रवेशपात्र ठरविण्यात आले आहेत. या पात्रता निकषांनुसार महाराष्ट्रातून परीक्षा दिलेल्या ९६,५४६ विद्यार्थ्यांपैकी सर्व प्रवर्गाचे मिळून फक्त ३३,९६४ विद्यार्थी प्रवेश पात्र ठरले आहेत. गेल्या वर्षी एमएचटी-सीईटी दिलेले २८,६१६ विद्यार्थी प्रवेश पात्र ठरले होते. त्या तुलनेत यंदा नीटमधून प्रवेश पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची संख्या वाढलेलीच आहे. त्यामुळे स्पर्धाही गेल्या वर्षीप्रमाणेच असेल. राज्याच्या वैद्यकीय संचालनालयाच्या अखत्यारित असलेल्या एमबीबीएस-बीडीएसच नव्हे तर आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी, ओटी, फिजिओथेरपी, बीएएसएलपी, बीपीओ आणि नर्सिग या इतर वैद्यकीय अभ्यासक्रमांचे प्रवेशही नीटमधूनच केले जाणार आहेत. या शिवाय मुंबईचे सोमैय्या, पुण्याजवळचे काशीबाई नवले, पुणे आणि लातूरचे एमआयटी या चार खासगी महाविद्यालयांचे प्रवेशही संचालनालय केंद्रीय प्रवेश प्रक्रियेद्वारे नीटमधून केले जातील. या  पाच हजार जागांपैकी १५ टक्के अखिल भारतीय स्तरावरील कोटा वगळता उर्वरित सुमारे चार हजार जागांचे प्रवेश ३३,९६४ विद्यार्थ्यांमधून केले जातील.
अर्थात अखिल भारतीय स्तरावरील कोटय़ासाठी नीटचेच गुण ग्राह्य़ धरण्यात येणार असल्याने राज्याच्या विद्यार्थ्यांना १५ टक्के कोटय़ातूनही प्रवेश घेण्याची मुभा राहील.

देशभरातील प्रवर्गनिहाय प्रवेशपात्र विद्यार्थी
प्रवर्ग        गुण दरम्यान        पात्र विद्यार्थी
खुला गट    ६९१-९८   ,           १५७,२१४
ओबीसी        ६२९-८१      ,      १ ४९,०७८
एससी        ६१०-८१                ४२,२३४
एसटी        ५८६-८१                १६,५१८