दहावीप्रमाणेच बारावीच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी ऑक्टोबरऐवजी जुलैमध्येच फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय पुढील वर्षी घेतला जाईल, असे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टीने महत्त्वाचे एक वर्ष वाचणार आहे. अभियांत्रिकीसह सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा लाभ पुढील वर्षी घेता येणार आहे.
दहावीआधी बारावीची परीक्षा होते व निकालही जाहीर होतो. दहावीतील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी जुलैमध्ये फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय सरकारने जाहीर केला व तो यंदापासून अमलात येत आहे. पण बारावीचा निकाल आधीच जाहीर झाला असून त्यांना मात्र हा लाभ नव्हता. त्यांना यंदाच्या ऑक्टोबरमध्येच परीक्षा द्यावी लागणार आहे. पण आता बारावीची फेरपरीक्षा जुलैमध्ये घेण्यास पुरेसा अवधी शिल्लक नाही. त्यामुळे बारावीसाठीचा निर्णय पुढील वर्षी घेतला जाणार आहे.
बारावी हा करिअरच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा असून अभियांत्रिकीसह व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया सप्टेंबरअखेरीपर्यंत सुरू राहते. दहावीप्रमाणेच बारावीची फेरपरीक्षा जुलैमध्ये होऊन ऑगस्टमध्ये निकाल जाहीर झाला, तर त्यात उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणे सुलभ होणार आहे. अभियांत्रिकीच्या हजारो जागा दरवर्षी शिल्लक राहतात. बारावी फेरपरीक्षाही जुलैमध्ये झाल्यास या रिक्त जागांची संख्या कमी होऊ शकणार आहे.