एमए, एमएस्सीच्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाचा दिलासा

पहिले सत्र उशिरा सुरू झाले असतानाही पुढल्या महिना-दीड महिन्यात परीक्षा उरकण्याच्या भूमिकेपासून अखेर माघार घेत मुंबई विद्यापीठाने एमए, एमएस्सी या आपल्या काही पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा तब्बल महिनाभर पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. अभ्यासाला वेळ न मिळाल्याने परीक्षेला सामोरे कसे जायचे या विचाराने हवालदिल झालेल्या विद्यार्थ्यांना यामुळे दिलासा मिळाला आहे.
यंदा मुंबई विद्यापीठाच्या अनेक पदवी व पदव्युत्तर परीक्षांचे निकाल लांबले. परिणामी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे प्रवेशच मुळात उशिरा म्हणजे सप्टेंबपर्यंत झाले. त्यात विद्यापीठाने एमएस्सी, एमए आदी पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केल्याने विद्यार्थी हवालदिल झाले होते. कारण, ऑक्टोबर-नोव्हेंबरमधील या वेळापत्रकांनुसार चालायचे तर अनेक विषयांच्या अध्यापन-अध्ययनाला अवघे ३० ते ३५ दिवस मिळणार होते. ‘विद्यापीठ अनुदान आयोगा’च्या नियमांनुसार प्रत्येक सत्रासाठी किमान ९० दिवस अध्यापन करणे बंधनकारक आहे. त्यात ५० टक्केही अभ्यासक्रम पूर्ण करणे शक्य नसल्याने परीक्षा घ्यायची तरी कशाची, असा प्रश्न प्राध्यापकांना पडला होता. त्यामुळे या परीक्षा पुढे ढकलण्याची जोरदार मागणी विद्यार्थी आणि प्राध्यापकांकडून होत होती.
‘लोकसत्ता’ने हा घोळ १९ सप्टेंबरला वृत्त देऊन सर्वप्रथम या गोंधळावर प्रकाश टाकला होता. त्यानुसार एमए, एमएस्सी, एमए (समाजशास्त्र), एमए (राज्यशास्त्र), बीए (इंटिग्रेटेड-रशियन), एमए (पब्लिक पॉलिसी) आदी परीक्षांबरोबरच सीए परीक्षेच्या दिवशी आलेले टीबायबीकॉमचे पेपरही पुढे ढकलण्यात आले आहेत. साधारणपणे एक महिन्याने या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांनाही दिलासा मिळाला आहे. या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक नंतर जाहीर केले जाणार आहे.

शिक्षकांचे सहकार्य हवे : परीक्षा पुढे गेल्याने दुसरे सत्र लांबणार का, असा प्रश्न आता विद्यार्थी-शिक्षकांच्या मनात डोकावू लागला आहे. परंतु ‘मूल्यांकनाचे काम दिलेल्या वेळेत पूर्ण झाल्यास निकाल वेळेत जाहीर करणे कठीण नाही. मात्र त्यासाठी शिक्षकांचे सहकार्य विद्यापीठाकरिता मोलाचे आहे. कारण, ऐन दिवाळी आणि नाताळची सुट्टी परीक्षांच्या कामाकरिता द्यावी लागणार आहे. त्यामुळे शिक्षकांनी मूल्यांकनाच्या कामात सहकार्य केले तर पुढील सत्र लांबणार नाही,’ असा विश्वास परीक्षा नियंत्रक वसावे यांनी व्यक्त केला.